पाणीपुरवठा सुरळीत करा; 10-12 दिवस पाणी न मिळालेल्या भागात टँकर पाठवा, आमदार अॅड. दिलीप सोपल यांचे नगर परिषदेला पत्र

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. ७ जून : शहरात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत आमदार अॅड. दिलीप सोपल यांनी बार्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळावे तसेच ज्या भागांमध्ये 10 ते 12 दिवसांपासून पाणी पोहोचत नाही, त्या ठिकाणी त्वरित टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आमदार सोपल यांनी पत्रात म्हटले आहे की, शहरात सध्या आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असला तरी तोही नियमित होत नसून अनेक भागांमध्ये 10 ते 12 दिवसांनंतर अत्यल्प दाबाने पाणी मिळत आहे. पाइपलाइन दुरुस्ती, गळती किंवा तांत्रिक बिघाड यांसारखी कारणे वारंवार सांगितली जात असली तरी नागरिकांच्या अडचणी कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरातील विविध भागांतून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मागील आठ ते नऊ वर्षांत पाइपलाइन दुरुस्ती व देखभालीसाठी मोठा खर्च करण्यात आल्याचे अहवालांमध्ये नमूद असतानाही पाणीपुरवठा व्यवस्थेत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शहरातील वाढत्या असंतोषाची दखल घेत नियमित, पुरेशा दाबाने आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी आमदार सोपल यांनी केली आहे. तसेच ज्या भागांत दीर्घकाळ पाणी पोहोचत नाही, त्या भागांमध्ये नगर परिषदेमार्फत तातडीने पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्वरित आणि ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आमदार सोपल यांनी व्यक्त केली आहे.




