आरोग्यविषयक योजनांच्या लाभार्थ्यांसाठी विशेष आधार नोंदणी अद्ययावतीकरण शिबिर घ्यावे : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

B1न्यूज मराठी नेटवर्क
ठाणे : जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य विविध योजनांचा आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी आढावा घेतला. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम तातडीने वितरीत करण्याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने करावी. तसेच शासकीय आरोग्य विषयक योजनांच्या लाभासाठी आवश्यक आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात यावे, असे निर्देश यावेळी दिले.
आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गच्या जिल्हा नियामक मंडळाची बैठक, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, गुणवत्ता हमी कार्यक्रम आदी योजनांचा आढावा तसेच जन्म मृत्यू नोंदणी व जीवनविषयक आकडेवारी संदर्भातील आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, डॉ. स्वाती पाटील यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय अधिक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जननी-शिशु सुरक्षा कार्यक्रम, राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम, रोगी कल्याण समिती, टीबी/एचआयव्ही तपासणी आदी विविध आरोग्य विषयक उपक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला. टीबी, कुष्ठरोग व एचआयव्ही चाचण्या करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे. विशेष लहान मुलांच्या चाचण्यांवर भर द्यावा. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी शंभर टक्के होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत येणारा निधी आरोग्य व्यवस्थेवर पूर्ण खर्च होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. शिनगारे व श्री. जिंदल यांनी दिले.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांना मिळण्यासाठी आधार कार्डमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी दूर करून आधार नोंदणीमध्ये आवश्यक ते बदल करून घेण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी दिले. जन्म व मृत्यूची नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समित्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जन्म व मृत्यूची नोंदणी अहवाल ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने वेळेत सादर करावे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावे, असेही श्री. शिनगारे यांनी सूचना दिल्या.
जिल्हा आरोग्य यंत्रणेचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक
गेल्या सात/आठ दिवसापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने अतिशय योग्य रित्या परिस्थिती हाताळली. या काळात रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली, याबद्दल जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी या बैठकीत आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. रुग्णसेवेचा हा वसा असाच पुढेही सुरू राहील, अशी अपेक्षाही यांनी यावेळी व्यक्त केली.