घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र व कर्नाटकातील 160 सायकल रायडर्सचा सहभाग; पंढरपूर ते पंजाबमधील घुमाण असा 2,500 किलोमीटरचा प्रवास
B1न्यूज मराठी नेटवर्क
पंढरपूर, दि. 21 : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे 2 हजार 500 किलोमीटरच्या सायकल वारीचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे करण्यात आला. संत नामदेव महाराजांचे विचार आणि संत साहित्याचा प्रसार करणारी ही सायकल वारी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.
पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, श्री नामदेव दरबार कमिटी, श्री क्षेत्र घुमाण (पंजाब), सायकल रायडर्स असोसिएशन आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022 पासून संत शिरोमणी श्री नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.
दि. 21 नोव्हेंबर रोजी सुरू झालेली ही रथयात्रा व सायकल वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांतून प्रवास करून दि. 13 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमाण येथे पोहोचणार आहे. तेथे सायकल वारीचा समारोप होणार आहे. त्यानंतर हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांतून प्रवास करीत दि. 21 डिसेंबर रोजी रथयात्रा पुन्हा श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे. या रथयात्रा व सायकल वारीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील सुमारे 160 सायकल रायडर्स सहभागी झाले आहेत. यंदा सहभागी रायडर्सची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.
संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यासोबतच आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण आणि शिक्षण यांसारख्या सामाजिक विषयांवर जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या शुभारंभप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार राजू खरे, पालखी सोहळा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर टेमघरे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, , सायकल रायडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कोकणे, यांच्यासह सायकल रायडर्स उपस्थित होते.




