श्री भगवंत मंदिरात भक्तिसंगीताचा सुरेल जागर; ‘सूर दीपावली’ मैफल रंगली! लायन्स क्लब बार्शी टाऊन व स्वर संध्या ग्रुपचा संयुक्त उपक्रम; ५०० ते ७०० रसिकांची उपस्थिती

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दीपावली पाडव्याच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून लायन्स क्लब बार्शी टाऊन आणि स्वर संध्या ग्रुप, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री भगवंत मंदिरात आयोजित करण्यात आलेली ‘सूर दीपावली’ ही भक्तिसंगीत मैफल भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. अभंग, भक्तिगीते आणि सुरेल संगीताच्या सादरीकरणाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या मैफलीला बार्शी शहरातील सुमारे ५०० ते ७०० रसिकांनी उपस्थिती लावली.
दीपावली पाडव्याच्या निमित्ताने श्री भगवंत मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अशा मंगलमय वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या संगीत मैफलीने दीपोत्सवाच्या आनंदात अधिकच भर घातली. भक्तिसंगीताच्या माध्यमातून आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेत रसिकांनी कलाकारांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या मैफलीत डॉ. मदन देगावकर, सूर्यकांत वायकर, मधुसूदन चांडक, सी.ए. डॉ. तेजस्वी गपाट, सौ. गिरिजा पोळ, सौ. रुपाली शिंदे, सौ. दिपाली सहस्रबुद्धे आणि कैवल्य सहस्रबुद्धे यांनी आपल्या सुरेल आवाजातून विविध अभंग आणि भक्तिगीतांचे सादरीकरण केले. हार्मोनियमवर प्रसाद सहस्रबुद्धे, तर तबल्यावर तुषार गडगी यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. सौ. वैशाली जाधव यांनी आपल्या बहारदार निवेदनातून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या सांगतेनंतर लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष लायन आदित्य कोठारी यांनी मनोगत व्यक्त केले. भक्तिसंगीताच्या माध्यमातून समाजात आनंद, सकारात्मकता आणि आध्यात्मिक समाधान निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सूर दीपावली’ हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बार्शीकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्व रसिकांचे आभार मानले. यावेळी स्वर संध्या ग्रुपच्या गायक कलाकारांसह संगीत क्षेत्रातील सहकाऱ्यांचा लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या वतीने सन्मान करण्यात आला. क्लबचे सचिव लायन द्वारकेश डोईफोडे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वर संध्या ग्रुपचे सूर्यकांत दादा वायकर, डॉ. मदन देगावकर, मधुसूदन चांडक तसेच लायन्स क्लबचे सहसचिव लायन प्रेमजी भानुशाली, खजिनदार लायन शिशिर मते आणि सौ. प्रतीक्षा आदित्य कोठारी यांनी विशेष परिश्रम घेतले. दीपावलीच्या उत्सवाला भक्तिसंगीताची सुरेल जोड देणारा ‘सूर दीपावली’ हा उपक्रम बार्शीकरांसाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंदाची अविस्मरणीय पर्वणी ठरला.




