दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी ऊसतोड हार्वेस्टरऐवजी मजुरांमार्फत करण्याचे आवाहन

ऊसतोडणीदरम्यान उपलब्ध होणारा हिरवा चारा पशुपालकांना तातडीने द्यावा; जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे साखर कारखान्यांना निर्देश
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : जिल्ह्यात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत अत्यल्प व खंडित पाऊस झाल्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी साखर कारखान्यांनी ऊसतोडणी हार्वेस्टर मशीनऐवजी ऊसतोड कामगारांमार्फत (मॅन्युअल पद्धतीने) करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाने ५ नोव्हेंबर रोजी सर्व साखर कारखान्यांच्या संचालकांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.
हार्वेस्टर मशीनद्वारे ऊसतोडणी केल्यास उसाचे पाचट व वरील भागातील हिरवा चारा (वाढे) नष्ट होतो किंवा त्याचा जनावरांसाठी उपयोग करणे शक्य होत नाही. मात्र, ऊसतोड कामगारांमार्फत पारंपरिक पद्धतीने ऊसतोडणी केल्यास मोठ्या प्रमाणात हिरवा चारा व पाचट उपलब्ध होऊ शकते. हा चारा ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
त्यामुळे साखर कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसतोडणी करताना हार्वेस्टर मशीनचा वापर टाळून ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांमार्फत किंवा कोयता पद्धतीने ऊसतोडणी करावी. तसेच ऊसतोडणीदरम्यान उपलब्ध होणारा हिरवा चारा स्थानिक शेतकरी व पशुपालकांना त्यांच्या जनावरांसाठी तातडीने उपलब्ध करून द्यावा. यासाठी ऊस विकास अधिकारी व मुकादमांना आवश्यक सूचना द्याव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पशुधनाचे संरक्षण करणे आणि संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. साखर कारखान्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.




