कृषीमहाराष्ट्रयोजनारायगड

जिल्ह्यातील ७२१ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध आतापर्यंत ११ हजार १४५ शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी जाहीर; पात्र शेतकऱ्यांना प्रमाणीकरणाचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

रायगड-अलिबाग, दि. २३ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील ७२१ शेतकऱ्यांची चौथी यादी २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११ हजार १४५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांनी नजीकच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज तसेच पुनर्गठित व फेर पुनर्गठन कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.500योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. रायगड जिल्ह्यातील बँकांनी योजनेच्या पोर्टलवर एकूण १२ हजार ७४ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. या माहितीच्या संगणकीय प्रक्रियेनंतर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
चौथ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांची नावे संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायती येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव तपासून ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी पडताळून घ्यावी आणि त्यानंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

या योजनेच्या यादीत एकापेक्षा अधिक बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे. काही राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या प्रकरणांत ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्ज निरंक करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत.
तसेच, योजनेतील पात्र मयत, वयोवृद्ध आणि बोटांच्या ठशांची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रायगड-अलिबाग तनवीर पाटील यांनी केले आहे.
500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button