दुचाकी खरेदीवेळी हेल्मेट मिळणे आवश्यक; नियमांचे पालन करण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

नागरिकांनी हक्कांविषयी जागरूक राहावे; विक्रेत्यांनी प्रमाणित हेल्मेट उपलब्ध करून द्यावे
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, दि. 23 : जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. दुचाकी वाहन खरेदी करताना ग्राहकांना नियमानुसार हेल्मेट उपलब्ध करून देण्याच्या तरतुदींचे सर्व विक्रेते व डीलर्स यांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.
रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका कमी करण्यासाठी दुचाकी चालकासह सहप्रवाशानेही योग्य दर्जाचे हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. हेल्मेटचा वापर केवळ कायदेशीर बंधन म्हणून न पाहता स्वतःच्या जीविताच्या संरक्षणासाठी महत्त्वाची बाब म्हणून पाहावे, असेही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी खरेदीवेळी हेल्मेटची खात्री करावी नवीन दुचाकी वाहन खरेदी करताना ग्राहकांनी संबंधित विक्रेत्याकडून नियमानुसार हेल्मेट मिळत असल्याची खात्री करावी. हेल्मेट भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) निर्धारित मानकांनुसार प्रमाणित असल्याची तपासणी करावी. हेल्मेटसाठी स्वतंत्रपणे अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्यास संबंधित बिल व पावती जतन करून ठेवावी. वाहन विक्रेत्याकडून लागू नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक पुराव्यांसह प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे तक्रार नोंदवावी.
विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे सर्व दुचाकी वाहन विक्रेते व डीलर्स यांनी नवीन वाहन विक्रीच्या वेळी ग्राहकांना हेल्मेट उपलब्ध करून देण्यासंबंधीच्या लागू कायदेशीर तरतुदींचे पालन करावे. ग्राहकांना BIS/ISI प्रमाणित हेल्मेट उपलब्ध करून देतानाच हेल्मेट दिल्याची पावती अथवा आवश्यक पुरावा जतन करावा. वाहन विक्री व्यवहार, हेल्मेट, अॅक्सेसरीजची बिले व संबंधित कागदपत्रांच्या नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात. ग्राहकांना हेल्मेट देण्यास नकार देणे किंवा संबंधित नियमांचे उल्लंघन करणे टाळावे.
लागू कायदे व नियमांचे उल्लंघन निदर्शनास आल्यास प्रचलित कायद्यातील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही परिवहन विभागाने दिला आहे.
रस्ता सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी दुचाकीस्वारांनी स्वतःच्या तसेच सहप्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक प्रवासात योग्य हेल्मेटचा वापर करावा. नागरिक, वाहन विक्रेते व डीलर्स यांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून अपघातांमधील जीवितहानी कमी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.




