सोलापूर जिल्ह्यात २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम – १ ते १९ वयोगटातील ९,८३,७०६ मुलांना मिळणार जंतनाशक गोळ्या – डॉ. सतीश कोपुरवाड यांचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बालके व किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे, रक्तक्षयाचे प्रमाण कमी व्हावे आणि शारीरिक व बौद्धिक विकास चांगला व्हावा, या उद्देशाने येत्या २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी दिली आहे.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील ९,८३,७०६ बालकांना शाळा, अंगणवाडी व सर्व शासकीय आरोग्य संस्थांच्या माध्यमातून एकाच दिवशी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
जंत संसर्गाचे दुष्परिणाम आणि औषधाचे फायदे –
लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये आतड्यातील जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास पोषक तत्वांचे शोषण कमी होणे, रक्तक्षय, अशक्तपणा, भूक मंदावणे तसेच शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटणे असे गंभीर परिणाम होतात. नियमित जंतनाशक औषधोपचारामुळे हे जंत नष्ट होऊन मुलांचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शैक्षणिक प्रगतीला मदत होते.
वाटपाचे नियोजन – शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून, तर अंगणवाडीत नोंद असलेल्या बालकांना अंगणवाडी केंद्रात गोळ्या दिल्या जातील. शाळा किंवा अंगणवाडीत न जाणाऱ्या पात्र बालकांसाठी आरोग्य संस्थामार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व महिला व बालविकास विभाग यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे.
ज्या बालकांना २७ ऑक्टोबर रोजी आजारपण किंवा इतर कारणामुळे गोळी घेता आली नाही, त्यांच्यासाठी दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना २७ ऑक्टोबर रोजी जवळच्या शाळा, अंगणवाडी किंवा आरोग्य संस्थेत पाठवून मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी केले आहे.




