महाराष्ट्रसोलापूर

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा, विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचे निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर, दि. १४ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) सोलापूर जिल्ह्यातील सर्व कामे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांनी दिले.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (एसआयआर) कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुर्वसे, महसूल उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, सदाशिव पडदुने, सुमित शिंदे, विजया पांगारकर, जयश्री आव्हाड, सचिन इथापे यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.

बैठकीत विभागीय आयुक्त तेली-उगले यांनी एसआयआरच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. या कालावधीत कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याला रजा मंजूर करू नये. सर्व मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ) यांनी बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून हे काम काळजीपूर्वक व वेळेत पूर्ण करून घ्यावे. विशेषतः मतदार नोंदींमधील त्रुटी (ॲनॉमली) दूर करणे आणि मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.500जिल्ह्यात सध्या ३३ लाखांहून अधिक मतदारांच्या नोंदींचे मॅपिंग सुरू असून, त्रुटींची पूर्तता करण्याच्या कामाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून निर्धारित मुदतीत उद्दिष्ट पूर्ण करावे. प्रत्येक बीएलओने घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती व नोंदींची पडताळणी करावी. अंतिम मतदार यादी अचूक, त्रुटीमुक्त आणि पारदर्शक होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिले.

प्रारंभी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बैठकीत सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ आणि ३ लोकसभा मतदारसंघांशी संबंधित क्षेत्र असून, शहरी भागात १ हजार १८० व ग्रामीण भागात २ हजार ५६० अशी एकूण ३ हजार ७४० मतदान केंद्रे आहेत. एसआयआर अंतर्गत एकूण ३३ लाख १८ हजार ४२४ मतदारांपैकी २८ लाख ९ हजार ३२१ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित ५ लाख ९ हजार १०३ मतदारांमध्ये १ लाख ९३ हजार ४५० नो-मॅपिंग मतदार आणि ३ लाख १५ हजार ६५३ त्रुटी असलेल्या मतदारांचा समावेश आहे. या कामांना गती देऊन निर्धारित मुदतीत एसआयआरचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button