वृत्तपत्र विक्रेत्यांचा कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी बार्शीत तहसीलदारांना निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मंजूर करण्यात आलेल्या वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी बार्शी शहर व तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने बार्शी तहसीलदार एफ आर शेख यांना बार्शी शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीनेनिवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्कांसाठी तसेच कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. १० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामंडळाबाबत निर्णय झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मात्र निर्णयानंतरही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. निर्णय होऊनही अंमलबजावणी पुढे ढकलली जात असल्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नसल्याची भूमिका विक्रेत्यांनी घेतली आहे.
उन्हा-पावसाची तमा न बाळगता, थंडी-वाऱ्यात पहाटेपासून घरोघरी वृत्तपत्र पोहोचवणाऱ्या विक्रेत्यांच्या जीवनातील अडचणींचा विचार करून कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना तहसील कार्यालयामार्फत देण्यात आले यावेळी बार्शी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सचिन सुरेश बाबर यांच्यासह सोमनाथ गाढवे बाबासाहेब जाधव बंडू नागटिळक शरद काकडे ज्योतीराम बारुंगळे सचिन शेटे ताहेर काजी सादिक शेख सुरज कोतमिरे शिवाजी वैकुटे मुजाहिद काजी शाम थोरात आदी वृत्तपत्र विक्रेते निवेदन देतेवेळी उपस्थित होते.




