टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव निधीसह तत्काळ मंजूर करा; गावनिहाय सूक्ष्म नियोजनाचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

टंचाईसदृश परिस्थिती निवारणासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे
B1न्यूज मराठी नेटवर्क
अहिल्यानगर : कर्जत आणि जामखेड तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करावे. आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव निधीसह तात्काळ मंजूर करावेत, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात कर्जत-जामखेड तालुक्यांतील टंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हास्तरीय तसेच दोन्ही तालुक्यांतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठा, टँकर, चारा, जलस्रोत, कृषी आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकजा आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, तहसीलदार रवी सातवण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. दशरथ दिघे, भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गावनिहाय पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करा
कर्जत व जामखेड तालुक्यांतील शहरी तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेताना प्रा. शिंदे यांनी गावनिहाय पाणी उपलब्धता, लोकसंख्या आणि संभाव्य गरज यांचा विचार करून सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले. गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी स्थानिक पातळीवर पाणीवाटपाचे नियोजन करून टंचाईग्रस्त नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
ज्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे, त्या गावांची माहिती घेऊन आवश्यक टँकरची मागणी असलेले प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करावेत. तसेच विहिरी, तलाव आदी स्थानिक जलस्रोत पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित करण्याचे प्रस्तावही तातडीने पाठवावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
चारा उपलब्धतेसाठी गावपातळीवर नियोजन
अल्प पावसाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धतेचेही योग्य नियोजन करण्याच्या सूचना प्रा. शिंदे यांनी दिल्या. ज्या गावांमध्ये पाण्याची उपलब्धता आहे, तेथे चारा उत्पादनाला प्रोत्साहन देऊन स्थानिक पातळीवर चारा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाने पशुधनाच्या संख्येच्या तुलनेत आवश्यक चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
चारा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर महाडीबीटीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर पुढाकार घेण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात पौष्टिक चारा उपलब्ध करून देणाऱ्या हायड्रोपोनिक चारा निर्मितीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जल जीवन मिशनची अपूर्ण कामे सात दिवसांत मार्गी लावा
जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण झालेल्या गावांमध्ये संबंधित देयके आणि उर्वरित कामांची पूर्तता करून सात दिवसांच्या आत आवश्यक निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतानाच उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर, पाणीपुरवठा योजनांची पूर्तता, टँकर वितरणातील सुसूत्रता, शुद्ध पाण्याची उपलब्धता, पशुधनासाठी चारा आणि आगामी पीक नियोजन या सर्व बाबींचा समन्वयाने विचार करून टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
तुकाईचारी प्रकल्पाचे काम पूर्ण करून कार्यान्वित करण्याचे निर्देश
तुकाईचारी लाभक्षेत्रातील प्रकल्पाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून तो कार्यान्वित करण्याचे निर्देशही प्रा. शिंदे यांनी दिले. वन विभाग तसेच अन्य संबंधित विभागांच्या परवानग्यांबाबतच्या अडचणी तातडीने दूर करून प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी प्रशासनाला सांगितले.
स्थानिक समस्या तातडीने सोडविण्यावर भर
अल्प पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना शासनाच्या विविध विभागांमार्फत आवश्यक मदत व सहकार्य मिळावे, यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा. टंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वीच उपाययोजना हाती घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासन सज्ज राहावे. कोणतीही समस्या स्थानिक पातळीवर प्रलंबित राहू नये, यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश प्रा. शिंदे यांनी दिले.
बैठकीदरम्यान बोराळा, कोपर्डी, काळेवाडी, मिरजगाव, पाटेगाव, पाटेवाडी, निमगाव गांगर्डे, कुंभळी तसेच तेरा गाव परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वितरण आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध अडचणी मांडून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. संबंधित विभागांनी या प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.



