महाराष्ट्रसत्कारसोलापूर

अंगणवाडी सेविका समाजाच्या पुढील पिढीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : अंगणवाडी सेविका या केवळ सेविका नसून बालकांच्या संगोपनात व त्यांच्या सर्वांगीण विकासात मातृत्वाची भूमिका बजावत आहेत. समाजाची पुढील पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या करीत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

शिवछत्रपती रंग भवन येथील सभागृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात २५ अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी २०४७ पर्यंत विविध क्षेत्रांत सातत्याने काम करण्याची गरज आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता अभियान तसेच अंगणवाडी सेविकांचा सन्मान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अंगणवाडी सेविका बालकांच्या पोषण, संगोपन आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पुढील पिढीच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. महिला सक्षम झाल्यास कुटुंब आणि समाज अधिक सक्षम होतो. महिला व बालकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.500प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लाभार्थी व नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व उपक्रमांची माहिती पोहोचविण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढवून विकासाची प्रक्रिया अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात येत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

संयोजक मोहन डोंगरे यांनी अंगणवाडी सेविकांच्या कार्याचे कौतुक करताना, बालकांच्या संगोपनासह पोषण आणि सामाजिक जडणघडणीत त्या महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनीही अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, प्रशांत फत्तेपूरकर, स्थायी समिती सभापती रणजीता चाकोते, शिक्षणाधिकारी धनंजय ढेपे, शशिकांत चव्हाण, बाल विकास अधिकारी दीपक ढेपे यांच्या सह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button