परभणीत ‘भटके-विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

B1न्यूज मराठी नेटवर्क
परभणी : भटक्या-विमुक्त समाजाचा इतिहास, संघर्ष, हक्क आणि विकासाचा जागर यासाठी ३१ ऑगस्ट रोजी परभणीत ‘भटके-विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘भटकंतीचा इतिहास, संवादाची ओळख, सन्मान आणि विकास’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राजू एडके होते. प्रमुख व्याख्याते विजयकुमार पवार, अशासकीय सदस्य डॉ. केदार खटिंग, हनुमानसिंग कच्छवे, लक्ष्मण सोनवणे तसेच संयोजक तथा सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
कुमारी भक्ती रोकडे हिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित स्फूर्तीदायी पोवाडा सादर केला.
यावेळी दहावी, बारावी, नीट व जेईई परीक्षेत तसेच निबंध, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या आश्रमशाळा व वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शासकीय सेवेत रुजू झालेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
प्रमुख वक्ते विजयकुमार पवार यांनी भटक्या-विमुक्त समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
प्रास्ताविक अजमेर शेख यांनी केले. सूत्रसंचालन रेवणअप्पा साळेगावकर यांनी केले, तर संजय राठोड यांनी आभार मानले. लेखाधिकारी डॉ. वामन काकडे, निरीक्षक तुकाराम भराड आणि गणेश जाधव यांनी मान्यवरांचा ‘महात्मा फुले व सावित्रीबाई फुले वाङ्मय खंड’ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.




