बार्शी पोलिसांची नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, तलवार, चाकूसह सराईत गजाआड

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान बार्शी शहर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत गावठी बनावटीचे पिस्तूल, लोखंडी तलवार, धारदार चाकू आणि स्विफ्ट डिझायर कार असा तब्बल ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका सराईत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोन संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
ही कारवाई ११ ऑगस्टच्या रात्री ते १२ ऑगस्ट २०२६ च्या पहाटेदरम्यान बार्शी शहरातील सुभाषनगर परिसरात करण्यात आली. पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हरामठ हॉस्पिटल परिसरात एका स्विफ्ट डिझायर कारमध्ये एक संशयित इसम कमरेला पिस्तूल लावून बसला असून त्याच्यासोबत आणखी दोन जण आहेत.
माहिती मिळताच पोलिसांनी दोन पंचांसह घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. पोलिसांचे वाहन दिसताच कारमधील दोन इसम अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र पोलिसांनी कारमधील सचिन कुमार मरगणे (वय ३८, रा. सुभाषनगर, बार्शी) याला तत्परतेने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, सदर आरोपीचा तडीपार कार्यकाळ नुकताच संपला होता.
५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या झडतीमध्ये—
- गावठी बनावटीचे पिस्तूल (मॅगझिनसह) – ₹५०,०००
- लोखंडी तलवार – ₹४,०००
- धारदार चाकू – ₹१,०००
- स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH-14-EP-8402 – ₹५,००,०००
असा एकूण ₹५,५५,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन संशयित फरार या कारवाईदरम्यान राहुल अनभुले आणि दत्ता उंदरे, दोघेही रा. बार्शी, हे अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
आरोपींकडे पिस्तूल व इतर शस्त्रे बाळगण्याचा कोणताही परवाना आढळून आला नाही. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या शस्त्रविषयक जमावबंदी व निर्बंध आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल/अंमलदार मनसुब शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, ४, २५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत सपोनि सुनील धनवे, पोसई अभयकुमार माकणे, सपोफौ अजित वरपे, सूर्यकांत मगर, पोहेकॉ प्रविण साठे, सुनील बनसोडे, मपोहेकॉ शबाना कोतवाल, सागर सुरवसे, सचिन देशमुख, मनसुब शेख, अंकुश जाधव, दत्ता सोमवाड, अविनाश पवार, राहुल उदार, प्रल्हाद अकुलवार, सचिन नतनात, सतीश उघडे, सचिन राऊत, चापोका मस्के, चापोका झाडे आदींनी सहभाग घेतला.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन शहरात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर शस्त्रे, संशयास्पद हालचाली किंवा गैरप्रकार आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. तसेच गरज भासल्यास डायल ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन बार्शी पोलिसांनी केले आहे. बार्शी शहर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.




