गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक सुविधा मिळणार-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक एम.आर.आय. व सिटी स्कॅन मशिनचे लोकार्पण
B1न्यूज मराठी नेटवर्क
अहिल्यानगर : जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा शासकीय आरोग्य यंत्रणेतच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एम.आर.आय. आणि सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करण्यात आली आहेत. या अत्याधुनिक निदान सुविधांमुळे गंभीर व गुंतागुंतीच्या आजारांचे अचूक आणि वेळेत निदान होण्यास मदत होणार असून, सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक एम.आर.आय. व सिटी स्कॅन मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. घोगरे, आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, एमआरआय आणि सिटी स्कॅन या आधुनिक वैद्यकीय निदान प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या तपासण्या आहेत. शरीरातील विविध अवयवांशी संबंधित आजारांचे अचूक निदान करण्यासाठी एमआरआय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाची तपासणी करून तातडीने उपचाराची दिशा निश्चित करण्यासाठी सिटी स्कॅन सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना निदानासाठी लागणारा वेळ कमी होण्याबरोबरच उपचार प्रक्रियेलाही गती मिळणार आहे.
विशेषतः गंभीर रुग्णांच्या बाबतीत वेळेत निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने या सुविधांचा मोठा फायदा होणार आहे. अत्याधुनिक तपासण्यांचा खर्च सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी अनेकदा मोठा असतो. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये महागड्या तपासण्या करण्याची वेळ येते. जिल्हा रुग्णालयातच एमआरआय आणि सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गरीब व गरजू रुग्णांचा वैद्यकीय खर्च कमी होण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.




