भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत बार्शी तालुका पोलिस व जिजाऊ गुरुकुल सैनिक स्कूलच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ : भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलीस स्टेशन आणि जिजाऊ गुरुकुल सैनिक स्कूल, खांडवी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे खांडवी येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीच्या घोषणांनी आणि तिरंग्याच्या दिमाखदार उपस्थितीने संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाने दुमदुमून गेला.
ही रॅली बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे आणि जिजाऊ गुरुकुल सैनिक स्कूलचे संस्थापक संभाजी घाडगे सर यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. रॅलीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी, शाळेचे एनसीसी पथक, बँड पथक तसेच विद्यार्थी अशा सुमारे २५० जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
हातात तिरंगा, ओठांवर देशभक्तीपर घोषणा आणि मनात भारतमातेविषयी अभिमान अशा उत्साहपूर्ण वातावरणात खांडवी गावातून रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि पोलिसांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “हर घर तिरंगा” अशा घोषणा देत नागरिकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याविषयी अभिमानाची भावना जागृत केली.
या रॅलीच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविणे, राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करणे आणि राष्ट्राच्या एकतेचा संदेश देणे हा उद्देश साध्य करण्यात आला.
रॅलीदरम्यान गावातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत तिरंग्याला अभिवादन केले. अनेकांनी आपल्या घरांसमोर उभे राहून विद्यार्थ्यांचे आणि पोलिसांचे स्वागत केले. त्यामुळे संपूर्ण खांडवी परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
रॅलीची सांगता झाल्यानंतर बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना केळी व बिस्कीटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे पोलिसांनी कौतुक करत त्यांच्या सहभागाबद्दल अभिनंदन केले.
या उपक्रमामुळे पोलीस व विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ झाला असून नागरिकांशी असलेले पोलिसांचे नाते अधिक मजबूत झाले आहे. तसेच तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, एकता आणि राष्ट्रीय ध्वजाविषयी आदरभाव वाढविण्यास या तिरंगा रॅलीमुळे निश्चितच मोठी मदत झाली आहे. 





