कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये भारताचे पहिले ग्रंथपाल, ग्रंथालयशास्त्राचे जनक तसेच भारतात सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे आणि द्विबिंदू वर्गीकरण पद्धतीचा शोध लावणारे पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १३४ वी जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी भागवत बोबडे, सामाजिक कार्यकर्ते नय्युम भाई शेख मंत्री, शाम जानराव, प्रेम अग्रवाल यांच्यासह ग्रंथालयाचे सभासद, वाचक व हितचिंतक उपस्थित होते.
यावेळी ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी तसेच वाचकांना विविध विषयांवरील ज्ञानसंपदा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्य करणारे ग्रंथपाल विनोद गायकवाड यांचा उपस्थितांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी भारतातील ग्रंथालय चळवळीला व्यापक दिशा देत वाचन आणि ज्ञानप्रसाराचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या कार्याची आठवण ठेवून राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथालयांचे महत्त्व आणि वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास ग्रंथप्रेमी, सभासद व वाचकांची उपस्थिती होती.





