अक्कलकोट उत्तर पोलिसांच्या डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; २४ तासांत चोर जेरबंद, ज्येष्ठ महिलेचे दागिने व रोख रक्कम परत

B1न्यूज मराठी नेटवर्क
अक्कलकोट, दि. ७ ऑगस्ट : अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने अवघ्या २४ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत ज्येष्ठ महिलेचे अर्ध्या तोळ्याचे दागिने व ₹१२,६०० रोख रक्कम परत मिळवून देण्यात यश मिळवले. पोलिसांच्या वेगवान, तांत्रिक आणि अचूक तपासामुळे आरोपीला अटक करण्यात आली असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समर्थ नगर, अक्कलकोट येथील श्रीमती लक्ष्मीबाई रामचंद्र गड्डद (वय ७७) या फत्तेसिंह चौकातील गणेश पोतदार यांच्या के.पी. कॉम्प्युटर्स एसबीआय ग्राहक सेवा केंद्रात पेन्शन काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी सकाळी ११.२४ वाजता ₹१२,६०० रक्कम काढून ती अर्ध्या तोळ्याच्या बोरमाळीसह पर्समध्ये ठेवली. बीपीचा त्रास झाल्याने त्या काही वेळ सेवा केंद्रात बसून राहिल्या आणि त्यानंतर रिक्षाने घरी गेल्या. घरी पोहोचल्यावर पर्स उघडली असता रोख रक्कम आणि बोरमाळ गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घाबरलेल्या लक्ष्मीबाईंनी तातडीने ग्राहक सेवा केंद्र गाठून चौकशी केली. प्राथमिक तपासात कोणताही ठोस धागा मिळाला नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही अस्पष्ट असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. मात्र डीबी पथकाने हार न मानता फत्तेसिंह चौकातील आयडीबीआय बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेतला. त्यामधील संशयास्पद हालचालींच्या आधारे पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि संशयितांची कसून चौकशी केली.
अखेर पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले आणि चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून अर्ध्या तोळ्याची बोरमाळ व ₹१२,६०० रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात प्रथम खबर क्रमांक ०४३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश पवार यांच्या नेतृत्वात डीबी पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले, पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे, विकास पवार व केदारनाथ सुतार यांनी केली.
ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची तातडीने गांभीर्याने दखल घेत अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीला अटक करण्यात आल्याने अक्कलकोट उत्तर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेषतः पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले व पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे यांच्या तपासातील भूमिकेचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
दागिने व रोख रक्कम परत मिळाल्यानंतर श्रीमती लक्ष्मीबाई गड्डद यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलिस निरीक्षक अविनाश पवार, डीबी पथकातील अधिकारी-कर्मचारी तसेच अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पोलिस निरीक्षक अविनाश पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले, पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे, पोलिस कॉन्स्टेबल धोंडिबा ठेंगळे व नागरिक उमेश पाटील आदी उपस्थित होते.




