व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत ओंकार हिंगमिरे यांची सहसरचिटणीसपदी नियुक्ती
विजय चोरडिया प्रदेशाध्यक्ष; अजितदादा कुंकलोळ व नरेंद्र देशमुख विभागीय प्रदेशाध्यक्ष
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : व्हॉईस ऑफ मीडिया, व्हीओएम इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून बार्शीचे पत्रकार ओंकार हिंगमिरे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर सहसरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीतून राज्याच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने हिंगमिरे यांच्या संघटनात्मक कार्याची आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची दखल घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विजय चोरडिया, विभागीय प्रदेशाध्यक्षपदी अजितदादा कुंकलोळ आणि नरेंद्र देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याच कार्यकारिणीत ओंकार हिंगमिरे यांच्यावर सहसरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बार्शी व सोलापूर जिल्ह्यात पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच संघटनात्मक पातळीवर काम करत असताना त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना राज्याच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांचे आरोग्य, शिक्षण, घरकुल, अद्ययावत तंत्रज्ञान, पेन्शन, अधिस्वीकृती, पत्रकारांची सुरक्षा आणि इतर प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यभर प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.
प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी पत्रकारांच्या प्रश्नांसाठी राज्यभर संघटित आणि प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. विभागीय प्रदेशाध्यक्ष अजितदादा कुंकलोळ आणि नरेंद्र देशमुख यांनीही आपल्या विभागातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. जिल्ह्याच्या कार्यकारिणीतून थेट महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर सहसरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने ओंकार हिंगमिरे यांचे बार्शीतील पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.





