जिल्ह्यातील युवा शेतकरी प्रतिभा महाजन आणि उपकृषी अधिकारी मनोज गायधने यांची पुरस्कारासाठी निवड

सन २०२३ च्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांची घोषणा
B1न्यूज मराठी नेटवर्क
वर्धा, दि.22 : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सन २०२३ च्या विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर विभागांतर्गत वर्धा जिल्ह्यातील युवा महिला शेतकरी प्रतिभा महाजन आणि शासकीय श्रेणीतील पुरस्कारासाठी उप कृषि अधिकारी मनोज गायधने यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व मार्गदर्शक कार्य करणाऱ्या राज्यातील प्रयोगशील शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांना दरवर्षी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन २०२३ करिताचे हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निश्चित केलेल्या नावांना शासनाने अंतिम मंजुरी दिली असून लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पवनी येथील युवा प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा महाजन यांची युवा शेतकरी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांनी शेतीमध्ये राबविलेले नाविन्यपूर्ण प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबाबत पुरस्कारासाठी तर गिरड येथे कार्यरत असलेले उपकृषी अधिकारी मनोज झिबलराव गायधने यांची नागपूर विभागातून शासकीय श्रेणीतील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या दोन्ही पुरस्काराच्या निवडीबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, कृषी विभागाचे अधिकारी आणि नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारांमुळे जिल्ह्यातील इतर युवा शेतकऱ्यांना तसेच कृषी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे, असा विश्वास अरविंद उपरीकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.




