“नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकराज्य फाऊंडेशनकडून ६०० शैक्षणिक साहित्य संचांचे वाटप”

महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना लोकराज्य फाऊंडेशनची शैक्षणिक मदत
B1न्यूज मराठी नेटवर्क
मोहोळ देवडी, दि. १५ जून २०२६ : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी या उद्देशाने लोकराज्य फाऊंडेशन, देवडी यांच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, देवडी येथे सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना सुमारे ६०० वह्या, पेन आणि पुस्तके यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही या सामाजिक कार्याचे स्वागत केले.
या कार्यक्रमास लोकराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर थोरात, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक तिपे सर, माजी मुख्याध्यापक तळेकर सर, माजी शिक्षक काकडे सर, सोसायटीचे चेअरमन सुहास थोरात, विजयसिंह थोरात तसेच शिक्षक हनुमंत आसबे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाच्या विकासासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
लोकराज्य फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, “समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो” ही भावना मानवी जीवन समृद्ध करणारी आहे. आपण ज्या समाजात वाढलो, घडलो आणि यशस्वी झालो त्या समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.




