सोलापूर विधान परिषद महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राजेंद्र राऊत यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत सोलापूरच्या विकासासाठी मार्गदर्शन केले. महायुती सरकार सोलापूरच्या शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. विधान परिषदेत जनतेचे प्रश्न भक्कमपणे मांडण्यासाठी राजेंद्र राऊत सक्षम आहेत, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले की राजेंद्र राऊत हे माझे विश्वासू सहकारी आहेत. पराभवानंतरही त्यांनी बार्शीत भाजपची संघटना मजबूत केली, प्रत्येक निवडणूक जिंकून दिली. अशी माणसे पक्षाची खरी ताकद आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की महायुती धर्म पाळून आम्ही राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. सोलापूरचा विकास महायुतीच करू शकते आणि राजेंद्र राऊत तेच काम विधान परिषदेत करतील.
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी सांगितले की महायुतीच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. राजेंद्र राऊत हे शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांसाठी विधान परिषदेत प्रभावी आवाज उठवतील.
याप्रसंगी राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी दिल्याबद्दल महायुतीच्या नेतृत्वाचे आभार मानले. सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू,अशी ग्वाही त्यांनी दिली,यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे, शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील,पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे,सांगोला आमदार बाबासाहेब देशमुख, शहाजी पवार,मंगेश चिवटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.




