क्राईमबार्शीमहाराष्ट्र

रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने ११ लाख ८० हजारांची फसवणूक

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी – रेल्वेत टी.सी. पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बार्शी व पुणे येथील तिघांनी संगनमत करून तब्बल ११ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुभाष बाबु डेंगळे (वय ६२, रा. पानगाव, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा चंद्रकांत डेंगळे हा सिव्हिल डिप्लोमा शिक्षित आहे. मागील दहा वर्षांपासून ओळख असलेले सुरेंद्र व्ही. कुलकर्णी (झरेगांवकर), रा. ढगे मळा, कुर्डुवाडी रोड, बार्शी यांनी जानेवारी २०२५ मध्ये “रेल्वेत टी.सी. पदावर नोकरी लावतो” असे आमिष दाखवले होते.

त्यासाठी सुरुवातीला चंद्रकांतची शैक्षणिक कागदपत्रे घेतल्यानंतर “नोकरीसाठी ८ लाख रुपये लागतील” असे सांगण्यात आले. त्यापैकी ४ लाख रुपये ॲडव्हान्स स्वरूपात द्यावे लागतील, असे सांगून सुभाष डेंगळे यांच्याकडून टप्प्याटप्प्याने २० मार्च २०२५ पर्यंत ४ लाख रुपये रोख स्वरूपात घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.500यानंतर सुरेंद्र कुलकर्णी यांनी पुणे येथील संकेत खंडेराव पायगुडे यांच्याशी संपर्क करून दिला. पुढील सर्व प्रक्रिया संकेत पायगुडे करणार असल्याचे सांगण्यात आले. दोघांकडून वारंवार फोन करून “नोकरी निश्चित होणार” अशी खात्री दिली जात होती. दरम्यान, आणखी दोन जागा उपलब्ध असल्याचे सांगत इतर उमेदवार शोधण्यास सांगण्यात आले. त्यानुसार आजिनाथ नवनाथ मोहिते (रा. रस्तापूर) व रशीद इसामुद्दीन इनामदार (रा. पानगाव) यांनाही रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

एप्रिल २०२५ मध्ये बार्शीतील राणी लक्ष्मीबाई उद्यान येथे बैठक घेऊन प्रत्येकी दोन लाख रुपये ॲडव्हान्स मागण्यात आले. रोख पैसे नको असल्याचे सांगितल्यानंतर पुणे येथील नितीन नागेश मोहिरे यांच्या IDBI बँक खात्यावर RTGS द्वारे पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. “नितीन मोहिरे हे रेल्वेतील मोठे अधिकारी असून त्यांच्या सहीशिवाय ऑर्डर निघत नाही,” असे सांगून विश्वास संपादन करण्यात आला.500त्यावर विश्वास ठेवून आजिनाथ मोहिते यांनी वेळोवेळी RTGS द्वारे ३ लाख ८० हजार रुपये पाठवले. तसेच रशीद इनामदार व त्यांचा मुलगा नदीम इनामदार यांनी मिळून ४ लाख रुपये संबंधित खात्यावर जमा केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, वारंवार विचारणा करूनही नोकरीची ऑर्डर मिळाली नाही. संबंधित आरोपींकडून सतत टाळाटाळ केली जात होती. काही दिवसांनी नितीन मोहिरे यांचा मोबाईल बंद लागण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तक्रारदारांनी सुरेंद्र कुलकर्णी यांच्याकडे पैसे परत मागितले असता त्यांनी उलट दमदाटी करत “मी तुम्हाला ओळखत नाही, कुठे जायचे तिथे जा,” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार सुरेंद्र व्ही. कुलकर्णी (झरेगांवकर), (रा. बार्शी), संकेत खंडेराव पायगुडे, (रा. पुणे), नितीन नागेश मोहिरे, (रा. सदाशिव पेठ, पुणे) या तिघांनी संगनमत करून रेल्वेत नोकरी लावण्याच्या नावाखाली एकूण ११ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button