रमजान – ईदपूर्वी गुलबहार कबरस्तान स्वच्छ करा; इलियास शेख यांची नगर परिषदेला मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील मुख्य कबरस्तानात स्वच्छता करणे तसेच वाढलेल्या झाडांची छाटणी करण्याची मागणी इलियास शेख यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी नगर परिषद बार्शी शहराच्या मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बार्शी शहरातील परिसरातील गुलबहार कबरस्तान हे शहरातील सर्वात मोठे व महत्त्वाचे कबरस्तान आहे. येथे शहरातील तसेच आसपासच्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. त्यामुळे या परिसराची स्वच्छता आणि देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्या कबरस्तान परिसरात मोठमोठी काटेरी झाडे व झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. तसेच काही ठिकाणी अस्वच्छताही दिसून येत आहे. यामुळे कबरस्तानात येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
लवकरच पवित्र रमजान महिन्यानंतर ईदचा सण येणार असून त्या दिवशी तसेच इतर दिवशीही कबरस्तानात भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर कबरस्तान परिसरातील वाढलेली झाडे तोडून किंवा छाटणी करून परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
नगर परिषद प्रशासनाने संबंधित विभागाला निर्देश देऊन कबरस्तान परिसरातील झाडांची तात्काळ छाटणी करावी तसेच संपूर्ण परिसराची स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी इलियास शेख यांनी केली आहे. या कामामुळे कबरस्तानात येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.






