सुयश विद्यालय बार्शी येथे महिला दिनानिमित्त ‘महिला जागर सप्ताह’ उत्साहात
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने सुयश विद्यालय, बार्शी येथे ‘महिला जागर सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये महिलांविषयी आदर, समानता आणि जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. इतापे मॅडम उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर मा. सौ. मोहिनी घोलप मॅडम आणि संस्थेच्या मार्गदर्शिका मा. सौ. प्रतिभा नलवडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. जगताप मॅडम, उपमुख्याध्यापक येवले सर, पूर्वप्राथमिक विभागाच्या प्रिन्सिपल चंदेले मॅडम, प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. देशमुख मॅडम, तसेच माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका मोरे मॅडम व साखरे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले होते. या बालसभेमध्ये विद्यार्थ्यांनी महिला सशक्तीकरणावर प्रभावी भाषणे केली. तसेच महिला शक्तीचा गौरव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी आपल्या मनोगतात मोहिनी घोलप मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आपल्या आयुष्यातील प्रेरणास्थान असलेल्या आई आणि आजी यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. महिलांच्या कष्ट, त्याग आणि योगदानामुळे समाजाची उभारणी होते, असे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. इतापे मॅडम यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी आणि त्या काळात घ्यावयाची स्वच्छता व आरोग्याची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिलांविषयी आदर, स्वाभिमान आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्साहात केले.





