ब्रह्माकुमारीज कुमार योगभट्टीचा होळी उत्सवाने आनंदमय समारोप
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ब्रह्माकुमारीज यांच्या बार्शी सेवाकेंद्राद्वारे आयोजित द्विदिवसीय राजयोग तपस्या कार्यक्रम (कुमार योगभट्टी) उत्साहात व आध्यात्मिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचा समारोप होळी उत्सव साजरा करून आनंदमय वातावरणात करण्यात आला. या भट्टिसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये साॅफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत असलेले तपस्वीकुमार ब्र. कु. राजीव गुप्ता हे उपस्थित होते.
या योगभट्टीत कुमारांनी स्वतःबद्दलच्या श्रेष्ठ स्मृतींची अर्थात स्वमान जागृती तसेच ईश्वराशी दोस्तीचा अनुभव घेतला. मैत्रीगीत, इष्टदेव महिमा गीत यांचा समावेश असलेली गाईडेड मेडिटेशन साधना करण्यात आली. तसेच स्वतःमधील उणीवा, अवगुण आणि कमकुवत बाजू यांचा शोध आत्मपरीक्षण योगसाधनेद्वारे घेत स्वपरिवर्तनाचा दृढ संकल्प करण्यात आला.
पहाटे अमृतवेळेची योगसाधना, मुरली चिंतन आणि विविध आध्यात्मिक सत्रांमुळे संपूर्ण वातावरण अत्यंत शांत, पवित्र व ऊर्जा देणारे झाले होते. होळी सणाच्या पूर्वसंध्येला, दिनांक १ मार्च रोजी रात्री ८ वाजता समारोप सोहळा पार पडला. यावेळी सोलापूर उपक्षेत्र संचालिका सोमप्रभा दिदी, बार्शी सेवाकेंद्र संचालिका संगीता दिदी तसेच सोलापूर उपक्षेत्रातील सेवासाथी ब्रह्माकुमारी बहिणींनी प्रत्येक कुमाराला आत्मस्मृतीचा तिलक व गुलाल लावून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. तसेच शिवबाबांचे चिन्ह असलेली टोपी कुमारांच्या डोक्यावर ठेवली. शिवबाबांचे चिन्ह असलेली पिशवी व नॅपकीन भेट म्हणून दिली. शिवबाबांचा प्रसाद ही प्रत्येकास देण्यात आला. यानंतर सर्व कुमारांनी होळी उत्सवाच्या गीतांच्या तालावर सभागृहात देहभान विसरून आनंदात तल्लीन होत सामूहिक नृत्याचा आनंद लुटला.





