एमआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू; २० वर्षीय तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुक्यातील जामगाव शिवारात असलेल्या एमआयटी (MIT) कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महाविद्यालयीन परिसरासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

कु. अंकिता शिवाजी शिंदे (वय २०, रा. अंबुलगा बुद्रुक, ता. निलंगा, जि. लातूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती शिक्षणासाठी एमआयटी कॉलेजच्या वसतिगृहात वास्तव्यास होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली. वसतिगृहातील ब्लॉक क्रमांक १०६ मधील खोली क्रमांक ३२ मध्ये अंकिता राहत होती. काल रात्रीपासून तिचा मोबाईल फोन बंद येत असल्याने तिच्या कुटुंबीयांना चिंता वाटत होती.

सकाळच्या सुमारास वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने ही बाब महिला सुरक्षारक्षक अनिता विनायक साखरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी तात्काळ अंकिताच्या खोलीकडे धाव घेतली. दरवाजा आतून बंद असल्याने आणि कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला असता आतून पडदे लावलेले दिसले.

खिडकीची कडी तोडल्यानंतर आत डोकावल्यावर अंकिताने खोलीतील सिलिंग फॅनला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती तात्काळ कॉलेज प्रशासन व बार्शी तालुका पोलीस ठाण्याला देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्राथमिक तपासात अज्ञात कारणावरून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव व पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या