पिस्तल कट्टा व जिवंत काडतूसांसह एकाला अटक
बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सतत सज्ज असलेल्या बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई एपीआय दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसला आहे.
दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.22 वाजण्याच्या सुमारास, बार्शी–माढेगाव रोडवरील यमाई मंदिर परिसरात पोलीस पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत दोन संशयित पिस्तल फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एपीआय दिलीप ढेरे, पीएसआय बालाजी वळसने यांच्यासह पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचत संशयित वाहनाचा पाठलाग केला.
वाहन अडवताना एक आरोपी पळून गेला, मात्र दुसऱ्या आरोपीस ताब्यात घेण्यात यश आले. त्याचे नाव अभिजीत चंद्रकांत जाधव (वय 22, रा. गारभवाणी नगर, परांडा, जि. धाराशिव) असे असून, पळून गेलेल्या आरोपीचे नाव धीरज कांतिलाल पवार (रा. सावदरवाडी, ता. परांडा, जि. धाराशिव) असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासादरम्यान आरोपीकडून एक पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन व एक पांढऱ्या रंगाची हुंडाई व्हर्ना कार (MH 08 Z 7475) असा 595000 रूपये किंमतीचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई एपीआय दिलीप ढेरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. त्यांना पीएसआय बालाजी वळसने, HC सुभाष सुरवसे, HC सोमनाथ खांडेकर, PC राहुल बोंदर, PC हनुमंत गवळी, PC गोविंद बचुटे, PC बालाजी हंगे, PC चिठलवाड यांनी मोलाची साथ दिली.
बार्शी तालुक्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी केलेल्या या धाडसी कारवाईबद्दल बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाचे नागरिकांतून कौतुक होत आहे. अशा तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.




