कृषीमहाराष्ट्रहिंगोली

आधुनिक शेती तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

B1न्यूज मराठी नेटवर्क500

हिंगोली : कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानासोबतच कृषी प्रक्रिया उद्योगांची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित विविध कार्यक्रमांच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ.श्रेणिक लोढा, माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी प्रक्रिया उद्योग ही भविष्यातील शेतीची मुख्य दिशा आहे. केव्हीके हिंगोलीकडून आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, प्रगत सिंचन पद्धती तसेच मोहफुलांसारख्या स्थानिक नैसर्गिक संसाधनांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केव्हीकेच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा, प्रयोगशाळांचा आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन उत्पादनवाढीसोबतच प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.500यावेळी पालकमंत्र्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील अत्याधुनिक मृदा परीक्षण प्रयोगशाळा तसेच अन्न प्रक्रिया प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. तसेच केव्हीकेच्या विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाची पाहणी करून विशेषतः मोहफुलांपासून तयार करण्यात आलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

आदिवासी महिलांना सायकल व्हील होचे वाटप

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आदिवासी शेतकरी महिलांच्या श्रमाची बचत व्हावी तसेच शेतीकामे अधिक सुलभ व्हावीत, या उद्देशाने पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘सायकल व्हील हो’ चे वाटप करण्यात आले. या साधनामुळे महिलांना शेतीतील आंतरमशागत व तण नियंत्रणाची कामे अधिक सुलभपणे करता येणार आहेत.

यानंतर पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात मोह वृक्षाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल केव्हीके हिंगोलीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमादरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button