बार्शीमहाराष्ट्र

आ. दिलीप सोपल यांची बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रांची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बार्शी तालुकाही त्याला अपवाद राहिला नाही. सोयाबीन, मका, उडीद यासारख्या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप सोपल यांनी चारे व वालवड या भागात अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली.

पाहणी दरम्यान आ. दिलीप सोपल यांनी कृषी अधिकारी व महसूल प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, “ज्या भागात पिकांचे, घरांचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाले आहे, तेथे तातडीने जागेवर जाऊन पंचनामे करण्यात यावेत. तालुकानिहाय अहवाल तयार करून तो वरिष्ठ प्रशासनाकडे पाठवण्यात यावा.”
तसेच, महसूल यंत्रणांनी मंडलनिहाय पावसाची नोंद ठेऊन, प्रत्येक गावात ‘ऑन द स्पॉट’ पंचनामे करावेत आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून तीन प्रतीत तयार कराव्यात, ज्यापैकी एक प्रती लोकप्रतिनिधी, एक वरिष्ठ प्रशासन आणि एक स्वतः त्यांच्या (आ. सोपल) कार्यालयाकडे सादर करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

“मी स्वतः पुढील आठवड्यात शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कुठलाही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी,” असे आवर्जून सांगत त्यांनी प्रशासनाला कार्यक्षमतेने काम करण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यात आ. दिलीप सोपल यांच्यासोबत नंदकुमार काशीद सर, दत्तात्रय जगदाळे, शेषेराव जगदाळे, बाबू देवकर, पंडित जाधवर, दत्तात्रय जाधवर तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button