एक ही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांनी तात्काळ पंचनामे पूर्ण करून आवाहल द्यावा
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर शहरात अतिवृष्टीने घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या घरांचा सर्व्हे करून तात्काळ पंचनामे करावेत
सोलापूर : जिल्ह्यामध्ये 10 सप्टेंबर 2025 रोजी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. तरी सर्व संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी अतिवृष्टीने शेती पिकाचे नुकसान झालेला एक ही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. व तत्काळ पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तसेच सोलापूर शहरातील पाणी जाऊन नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देशमुख, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, सुमित शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उत्तर सोलापूर तहसीलदार निलेश पाटील, दक्षिण सोलापूर तहसीलदार किरण जमदाडे, अक्कलकोट तहसीलदार विनायक मगर यांच्यासह सर्व संबंधित गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, शेती पिकाच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी सर्व तहसीलदार यांनी तीन ते पाच लोकांचे एक पथक तयार करावे. यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व अन्य कर्मचारी यांचा समावेश असला पाहिजे. हे सर्व पथके तयार केल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने पंचनामे करायचे याचे योग्य प्रशिक्षण द्यावे. तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्व पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजेत यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले.
यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील शेळगी व मार्डी या मंडळात अतिवृष्टी झाली असून पंचनामेबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी, वळसंग, बोरामणी या महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून शेतामध्ये पाणी असल्याने सोमवारपासून पंचनामे सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली तर अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, वागदरी, चपळगाव मैंदर्गी, जेऊर नागणसूर, तडवळ, किणी या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून पंचनामेच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली.
सोलापूर शहरात अतिवृष्टीने घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करावेत बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर शहरात अतिवृष्टी होऊन शहरातील अनेक नागरी भागात व नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून घरातील अन्नधान्य कपडे आणि अन्य बाबीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या अनुषंगाने सोलापूर महापालिकेने शहरातील आठ झोन मधील किती घरांमध्ये पाणी शिरले याचा सर्व्हे त्वरीत करून घरांची संख्या अंदाजे कळवावी व महसूल प्रशासनाच्या मदतीने पुढील दोन दिवसात अतिवृष्टीने पाणी घरात शिरून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.
उत्तर सोलापूर तहसील व सोलापूर महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घरांचे पंचनामे करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अतिवृष्टीने घराचे नुकसान झालेला एकही नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच आवश्यकतेनुसार पंचनामे करण्यासाठी पथकांची संख्या वाढवावी लागली तर ती तात्काळ वाढवावी, परंतु पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सोलापूर शहरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने माहिती दिली. तसेच महापालिकेच्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक घरात जाऊन सर्व्हे करावा असेही त्यांनी सांगितले.



