बार्शीतील सायकल दुकानात सुरू होता ‘कल्याण-मुंबई’ मटका; तिघांना अटक, १.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरातील लातूर रोडवरील तेलगिरणी चौक परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका जुगार अड्ड्यावर निर्भया पथकाने धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकल व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७६ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग तसेच बार्शी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक बार्शीकडून ही कारवाई करण्यात आली.
निर्भया पथकातील महिला पोलीस कॉन्स्टेबल नम्रता गटकुळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब घाडगे व चालक पोलीस कॉन्स्टेबल महानोर हे बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार लातूर रोड, तेलगिरणी चौक येथील रमाकांत पिसे यांच्या सायकल दुकानात काही इसम ‘कल्याण’ व ‘मुंबई’ नावाचा मटका जुगार चालवत असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. यावेळी तीन इसम येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडून आकड्यांवर पैसे स्वीकारून मटका जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये गणेश सोमनाथ पिसे (वय ३३, रा. सुभाषनगर, बार्शी), सुदेश पांडुरंग खुळपे (वय ३६, रा. सुभाषनगर, बार्शी) आणि शाम सोमनाथ काशीद (वय ३०, रा. गोकुळ किल्ला परिसर, बार्शी) यांचा समावेश आहे.
झडतीदरम्यान आरोपींकडून ६ हजार १६० रुपये रोख रक्कम, एक मोटारसायकल, दोन मोबाईल फोन, गणकयंत्र, पेन, मटक्याच्या चिठ्ठ्या, चिठ्ठी पुस्तके तसेच मटक्याचे आकडे प्रसिद्ध झालेली वर्तमानपत्रांची पाने असा एकूण १ लाख ७६ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात आरोपी हे अमोल सोमनाथ पिसे यांच्या सांगण्यावरून सदर ठिकाणी मटका जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




