पुणेमहाराष्ट्रसण

दुष्काळी दौऱ्यात भाऊबीजेचा स्नेहबंध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोनकरवस्तीवर शेतकरी कुटुंबासोबत केला फराळ

दुष्काळी परिस्थितीत पुरंदर उपसा सिंचनचे पाणी सुरू; जनावरांसाठी मुबलक चारा घेण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

अजितदादांनी पाहिलेली बारामतीच्या विकासाची स्वप्ने एकत्रितपणे पूर्ण करू

पुणे : दुष्काळाच्या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी असून शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन नियोजनही करण्यात येईल. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले असून जनावरांना भविष्यात चारा कमी पडू नये, यासाठी शासनाकडून मोफत चारा बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

दुष्काळी पार्श्वभूमीवर भाऊबीजेच्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील मुर्टी येथील सोनकरवस्तीवर जाऊन शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांच्या घरात सर्वांसोबत दिवाळीचा फराळ आणि झुणका-भाकर खाऊन त्यांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.500यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्नील रावडे, विविध विभागांचे अधिकारी, संभाजी नाना होळकर, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजवर्धन शिंदे, सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाणी आणि चाऱ्यासाठी तातडीच्या उपाययोजना
सोनकरवस्तीवरील शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधताना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शेतीसाठी पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी माहिती घेतली. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी दिवसातून तीन वेळा टँकर सुरू असल्याचे सांगण्यात आले. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणीही सोडण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा कमी पडू नये, यासाठी शासन मोफत चारा बियाणे उपलब्ध करून देत आहे. सध्या जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता असली तरी आगामी काळातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आतापासूनच अधिक प्रमाणात चारा पिकांची लागवड करावी, असे त्यांनी सांगितले.

सुपे सात गाव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करून परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल,अशी माहितीही त्यांनी दिली.500शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा तिहेरी लाभ
शासनाकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मिळाली का, अशी विचारणा उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतकऱ्यांकडे केली. यावेळी शेतकऱ्यांनी अग्रीम मदतीसोबतच कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे पैसेही खात्यात जमा झाल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजनांमधून मिळालेल्या या मदतीमुळे संकटाच्या काळात मोठा आधार मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

अजितदादांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करू
बारामती तालुक्याच्या विकासासाठी अजितदादांनी अनेक स्वप्ने पाहिली होती. ही सर्व स्वप्ने आपण एकत्रितपणे पूर्ण करू. पाण्याचा प्रश्न असो किंवा गावांमधील मूलभूत सोयी-सुविधांचा विषय असो, या सर्व प्रश्नांची नियोजनबद्ध पद्धतीने सोडवणूक करण्यात येईल. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण भागातील गरजा समजून घेऊन आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने हाती घेतल्या जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
500शेतकऱ्यांना मोफत चारा बियाण्यांचे वाटप दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी, यासाठी शासनाकडून मोफत चारा बियाणे वितरित करण्यात येत आहे. आगामी काळातील चारा टंचाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि अधिकाधिक क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते साहेबराव गलांडे आणि जनाबाई सोनवलकर यांना मोफत चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

ग्रामीण भागातील स्केटिंगपटू शिवम नलावडेचा गौरव
ग्रामीण भागात राहूनही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येते, हे शिवम नलावडे या स्केटिंगपटूने सिद्ध केले आहे. त्याने इंडोनेशिया आणि देहराडून येथे स्केटिंग स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवत यश संपादन केले आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोनवलकरवस्ती येथे शिवमचे विशेष कौतुक करून त्याचा गौरव केला. ग्रामीण भागातील अशा गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

जोगवाडी, अंबी येथेही भेटी; ग्रामस्थांशी साधला संवाद
सोनकरवस्तीवरील भेटीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी जोगवाडी येथे जाऊन शिवाराची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चाऱ्याची स्थिती आणि शेतीच्या पाण्याबाबत माहिती घेतली. या परिसरासाठी पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले असून येत्या काही तासांत ते संबंधित भागात पोहोचेल, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर अंबी येथे एका शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन कुटुंबीय व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी आणि स्थानिक प्रश्न जाणून घेतले. अंबी फाट्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री पवार यांनी निर्देश दिले.

दिवाळीच्या सणानिमित्त शेतकरी कुटुंबीयांमध्ये जाऊन त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत, त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांचा विश्वास देणारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची ही भेट ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरली.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button