दिवाळी सणानिमित्त बार्शी तालुका पोलिसांची नागरिकांना अनोखी भेट; १२ लाख ५७ हजारांचे ४५ मोबाईल शोधून केले परत!

चोरीस गेलेले व हरवलेले मोबाईल शोधण्यात बार्शी तालुका पोलिसांना यश; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलिसांनी नागरिकांना अनोखी दिवाळी भेट दिली आहे. चोरीस गेलेले तसेच हरवलेले तब्बल ४५ मोबाईल फोन शोधून ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत १२ लाख ७७ हजार रुपये असून बार्शी तालुका पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे मोबाईल चोरीस जाणे तसेच हरवण्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांची गांभीर्याने दखल घेत पोलीस प्रशासनाने विशेष पथकाची स्थापना करून मोबाईल शोधण्याची मोहीम हाती घेतली होती.
मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
या विशेष पथकाने CEIR पोर्टल तसेच आधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीस गेलेल्या व हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या विविध राज्यांतून हे मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईल वापरणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधित मोबाईल ताब्यात घेण्यात आले.
या विशेष मोहिमेत एकूण ४५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून त्यांची किंमत १२ लाख ७७ हजार रुपये आहे. हे सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप व सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या हस्ते परत करण्यात आले.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५९ गावे असून नागरिकांचे प्रवासादरम्यान मोबाईल गहाळ तसेच चोरीस जाण्याच्या घटना घडल्या होत्या. अनेक दिवसांपासून मोबाईल मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. दिवाळी सणाच्या निमित्ताने पोलिसांनी दिलेली ही भेट नागरिकांसाठी आनंददायी ठरली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाचे अभिनंदन केले आहे. दिवाळीच्या सणात नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळवून देत बार्शी तालुका पोलिसांनी सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यदक्षतेचा आदर्श निर्माण केला आहे.




