गुळपोळीच्या विद्यार्थिनीच्या चित्राची जागतिक स्तरावर दखल; युगांडातील शिक्षकाने साकारली राष्ट्रीय पक्ष्याची प्रतिकृती

जागतिक डॉट डे निमित्त जि. प. प्राथमिक शाळा गुळपोळी येथे अभिनव उपक्रम; आकांक्षा नरखडे हिच्या कलेचे कौतुक
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी , गुळपोळी : दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस जागतिक डॉट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जि. प. प्राथमिक शाळा गुळपोळी येथे जागतिक डॉट डे उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना टिंबांच्या साहाय्याने चित्रकलेची सर्जनशीलता आणि कल्पकता विकसित करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात शाळेतील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी आकांक्षा अमोल नरखडे हिने काढलेल्या चित्राची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली.
या कार्यक्रमानिमित्त समरील फाउंडेशन, बार्शीचे अध्यक्ष प्रा. शंकर अंकुश सर आणि अमेरिकेतील लॉरेन लिओ मॅडम यांनी झूम मीटिंगच्या माध्यमातून गुळपोळी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लॉरेन लिओ मॅडम यांनी जागतिक डॉट डेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच टिंबांचा वापर करून विविध चित्रे काढण्याचा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेतला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमादरम्यान इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी आकांक्षा अमोल नरखडे हिने काढलेले चित्र विशेष लक्षवेधी ठरले. या चित्रापासून प्रेरणा घेत युगांडा देशातील ‘ओसेन फ्लेक्स’ या शिक्षकाने युगांडाचा राष्ट्रीय पक्षी ग्रे क्राउन क्रेन याची प्रतिकृती तयार केली. त्यामुळे गुळपोळीच्या विद्यार्थिनीच्या कलाकृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, शाळेसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक राऊत सर यांनी झूम मीटिंगच्या माध्यमातून इंग्रजी भाषेत लॉरेन लिओ मॅडम यांच्याशी संवाद साधला. तंत्रस्नेही शिक्षक मच्छिंद्र पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी योग्य प्रकारे केली. कोरफळे केंद्राचे केंद्रप्रमुख आवटे साहेब यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवून मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत गवळी यांनी सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होईपर्यंत उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल केंद्रप्रमुख श्री. आवटे साहेब यांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
गुळपोळीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीच्या कलाकृतीने देशाच्या सीमा ओलांडत जागतिक स्तरावर प्रेरणा निर्माण केली असून, आकांक्षा नरखडे हिच्या या कलात्मक यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




