दिल्लीत महाराष्ट्राच्या ऊर्जा दालनाची छाप; अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात राज्य देशात दुसऱ्या स्थानी; डिजिटल सादरीकरण, व्हर्च्युअल सफर ठरतेय आकर्षण

B1न्यूज मराठी नेटवर्क
नवी दिल्ली : ऐतिहासिक गडकिल्ल्यांची ओळख आणि हरित ऊर्जेच्या दिशेने सुरू असलेली महाराष्ट्राची वाटचाल यांचा संगम साधणाऱ्या राज्याच्या ऊर्जा दालनाला ‘भारत रिन्यूएबल एनर्जी समिट–२०२६’मध्ये अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारत मंडपम येथे दि. २ ते ५ नोव्हेंबरपर्यंत आयोजित या परिषदेत महाराष्ट्र ‘फोकस स्टेट’ म्हणून सहभागी झाला असून, राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम लक्ष वेधून घेत आहेत.
केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने गुजरातनंतर देशात दुसरे स्थान मिळविल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या ऊर्जा दालनातील सादरीकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचे दर्शन या प्रदर्शनातून घडविण्यात येत आहे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा या चारही वीज कंपन्यांनी संयुक्तपणे उभारलेल्या दालनात प्रमुख योजना, प्रकल्प आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. आणि महाऊर्जाचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली या दालनाची उभारणी करण्यात आली आहे.
हरित ऊर्जा प्रकल्पांची व्हर्च्युअल सफर
दालनातील ‘इमर्सिव्ह व्हर्च्युअल रिअॅलिटी झोन’ अभ्यागतांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. या माध्यमातून घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०, मागेल त्याला सौर कृषिपंप योजना आणि सिन्नर सौर ऊर्जा प्रकल्पाची आभासी सफर अनुभवता येत आहे.
दृकश्राव्य सादरीकरणे आणि संवादात्मक डिजिटल माध्यमांतून चारही वीज कंपन्यांची कामगिरी उलगडण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीवर आधारित रचना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि माहितीची सुलभ मांडणी यामुळे दालन अभ्यागतांचे लक्ष वेधून घेत आहे. दालनातील ‘सेल्फी बूथ’लाही प्रतिसाद मिळत आहे.
मान्यवरांकडून उपक्रमांचे कौतुक
राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. आणि महाऊर्जाचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दालनाला भेट देऊन सादरीकरणाबाबत समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याच्या दालनाची उत्कृष्ट संकल्पना राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी महाराष्ट्र राज्यातील चारही वीज कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
राजस्थान ऊर्जा विकास आयटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शिवप्रसाद नकाते तसेच विविध राज्यांच्या ऊर्जा विभागातील वरिष्ठ व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दालनाला भेट देऊन विविध योजना आणि कार्यपद्धती यांची माहिती घेतली. महावितरणचे संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, महानिर्मितीचे संचालक अभय हरणे, संचालक (प्रकल्प) राजेश पाटील, कार्यकारी संचालक (सौर) गिरीश कुमारवार, महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर यांनीही दालनाला भेट दिली. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनी राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील उपक्रमांची माहिती घेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक केले.




