बार्शी तालुका पोलिसांचा अवैध धंद्यांवर धडाका!आगळगावात गुटखा जप्त, धसपिंपळगावात अवैध दारूविक्रीवर कारवाई ; गुटखा प्रकरणातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री तसेच अवैध दारूविक्रीविरोधात धडक कारवाई केली आहे. ११ ऑक्टोबर रोजी आगळगाव येथे किराणा दुकानातून ₹१७ हजार ७३४ किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तर धसपिंपळगाव येथे दोन स्वतंत्र कारवायांत ₹२ हजार ५९० किमतीचा अवैध दारूसाठा हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास धसपिंपळगाव गावच्या शिवारात जिवलग हॉटेलच्या पाठीमागील आडोशाला पोलिसांनी कारवाई केली. यावेळी चंद्रकांत बलभीम पिंगळे (वय ५८, सध्या रा. धसपिंपळगाव, ता. बार्शी) याच्याकडे विनापरवाना देशी दारूच्या १८० मिली क्षमतेच्या ११ सीलबंद बाटल्या आढळल्या. या दारूसाठ्याची किंमत ₹८८० असून, याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास धसपिंपळगाव गावाबाहेर नदीशेजारी मुन्ना भालेकर यांच्या पत्राशेडमागे पोलिसांनी दुसरी कारवाई केली. यावेळी संतोष अर्जुन धस (वय ५१, रा. धसपिंपळगाव, ता. बार्शी) याच्याकडे देशी दारूच्या १२ बाटल्या आणि रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या तीन बाटल्या आढळून आल्या. या दारूसाठ्याची एकूण किंमत ₹१ हजार ७१० असून, याप्रकरणीही महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांतून पोलिसांनी एकूण ₹२ हजार ५९० किमतीचा दारूसाठा जप्त केला.
११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आगळगाव येथील दशरथ किराणा स्टोअरमध्ये पोलिसांनी कारवाई केली. यावेळी उदय संजय कोल्हे (वय २४, रा. आगळगाव, ता. बार्शी) याच्याकडून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. पोलिसांनी कारवाईदरम्यान केआर १०००, केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला आणि शॉट लक्झरी च्युइंग टोबॅको असा एकूण ₹१७ हजार ७३४ किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे तसेच पोलीस अंमलदार सोमनाथ खांडेकर, अमृत खेडकर, गणेश दळवी, अमृता गुंड, प्रदीप चौधरी, महेश माने, ओमप्रकाश दासरे, रोहित बागल आणि अश्विनी साबळे यांनी सहभाग घेतला.
आगळगाव येथील प्रतिबंधित गुटखा प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के करीत असून, धसपिंपळगाव येथील दारूविक्रीच्या प्रकरणांचा तपास संबंधित तपासी अंमलदार करीत आहेत. बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. या कारवायांमुळे अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे.




