अवैध उत्खननाचे फोटो काढल्याच्या कारणावरून पत्रकाराला मारहाण व धमकी; बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शीतील एका पत्रकाराला अवैध खाण उत्खननाचे फोटो काढून ते महसूल प्रशासनाकडे पाठवल्याचा राग मनात धरून मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बार्शी येथील दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी प्रशांत चंद्रकांत खराडे (वय 46) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, रविवारी (दि. 31 मे) दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास ते शिवाजी आखाडा परिसरातील राहत्या घरी विश्रांती घेत असताना संबंधित आरोपी त्यांच्या घरासमोरील पत्राशेडमध्ये आला.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने कथितपणे एका खाणीच्या उत्खननाचे फोटो का काढले आणि ते तहसीलदारांकडे का पाठविले, याबाबत जाब विचारत त्यांना मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीसह इतर महिलांनाही शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी सचिन उर्फ बाळू जाधव (रा. सुभाष नगर, बार्शी) यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पत्रकारावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे पत्रकार संघटना व सामाजिक क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात येत असून, घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.




