फपाळवाडीत रेशन धान्याच्या काळाबाजारावर संयुक्त धाड : 31.15 लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. 7 ऑगस्ट : गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाकडून मोफत वितरित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशन) अन्नधान्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर बार्शी तालुका पोलिसांनी महसूल व पुरवठा प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत मोठा घाव घातला आहे. फपाळवाडी (ता. बार्शी) येथील पत्राशेडवर टाकलेल्या धाडीत तब्बल 19 हजार 300 किलो अन्नधान्य जप्त करण्यात आले असून वाहनांसह एकूण 31 लाख 15 हजार 981 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व तहसीलदार बार्शी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, फपाळवाडी गावच्या शिवारात रेल्वे स्टेशनसमोरील अरणगाव रस्त्यालगत मांगडे यांच्या शेतातील पत्राशेडमध्ये शासनाच्या रेशनचा मोठा साठा करण्यात आला असून तो ट्रक व पिकअपमधून विक्रीसाठी बाहेर पाठविण्याची तयारी सुरू आहे.
या माहितीच्या आधारे तहसीलदारांच्या आदेशानुसार बार्शी तालुका पोलीस, पुरवठा विभाग व महसूल प्रशासनाच्या पथकाने संयुक्त छापा टाकला. घटनास्थळी काही व्यक्ती पोत्यांमधील धान्य ट्रक व पिकअपमध्ये भरत असल्याचे आढळून आले. पंचनामा करून तपासणी केली असता शासनाकडून लाभार्थ्यांना मोफत वितरित करण्यात येणारा गहू, तांदूळ व उडीद डाळ मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले.
जप्त केलेला साठा
- गहू – 213 पोती
- तांदूळ – 169 पोती
- उडीद डाळ – 4 पोती
एकूण जप्त अन्नधान्याचे वजन 19,300 किलो इतके आहे.
कारवाईदरम्यान अन्नधान्यासह एक ट्रक, एक पिकअप व अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून एकूण मुद्देमालाची किंमत 31,15,981 रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रकरणी पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंटलवाड (तहसील कार्यालय, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी धनाजी अर्जुन मांगडे, गजेंद्र अर्जुन मांगडे, चांगदेव पिराजी दळवी व गणेश श्रीहरी कदम या चार आरोपींना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत.
प्राथमिक तपासात या काळाबाजाराच्या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी त्या दृष्टीने सखोल तपास सुरू केला आहे. गोरगरिबांच्या हक्काचे अन्नधान्य काळ्या बाजारात विकून अवैध नफा कमावणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप व तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे, गोविंद बचूटे तसेच पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यांविरोधातील ही धडक कारवाई बार्शी तालुक्यात चर्चेचा विषय ठरली असून, अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे स्वागत केले आहे.




