पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते 315 केव्ही रोहित्र व आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क
वर्धा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते आर्वी नाका येथे नवीन उभारण्यात आलेले 315 केव्हीचे रोहित्र व आरएमयूचे लोकार्पण तसेच म्हाडा कॉलनी येथे सुरु करण्यात आलेल्या शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, कार्यकारी अभियंता नरेश पारधी, नगर परिषदेच्या बांधकाम सभापती राखी पांडे, नगरसेवक सतिश मिसाळ, उज्वला पेठे, निलेश किटे, वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता क्षितीज अंबाडकर तसेच आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी माधुरी दिघेकरी आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील विविध भागांत नव्याने उभारण्यात आलेल्या तसेच कार्यान्वित झालेल्या संस्थांचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते 124 आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून म्हाडा कॉलनी येथील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, BPHU, PHU, UHWC यांसह ग्रामीण भागासोबतच महानगरपालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचाही समावेश आहे. नागरिकांना त्यांच्या घराजवळ गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना यामुळे अधिक बळ मिळणार आहे. तसेच शहरी भागातील नागरिकांनी आता प्राथमिक आरोग्य सुविधांसाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याची आवश्यकता पडणार नसून या आरोग्य वर्धिनी केद्रांत उपचाराची सुविधा निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या वेळेसोबत पैशाची बचत होणार असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
नवीन सुरु करण्यात आलेल्या रोहित्रामुळे म्हाडा कॉलनी व परिसरातील रोहित्रावर येणारा ताण कमी होऊन नागरिकांना अखंड विज पुरवठा करणे सोईचे होणार असल्याचेही पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. कार्यक्रमाला आशा, आरोग्य विर्धिनी केंद्रातील कर्मचारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




