नवी मुंबईमहाराष्ट्र

ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांना अनेक कौटुंबिक, सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना मानसिक आधार देण्याची गरज असून विरंगुळा केंद्रांच्या माध्यमातून समवयस्क लोक एकत्र येतात, भेटतात, सुख-दु:खाच्या गोष्टी करतात, त्यामुळे त्यांना मानसिक दिलासा मिळतो.

नवी मुंबई महानगरपालिकेचे हे काम ज्येष्ठांप्रती आपुलकी दर्शविणारे असून यापुढे जात ज्या ज्येष्ठांना काही अडचणींमुळे 15-20 दिवस राहण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी एखादे केंद्र असावे या संकल्पनेतून ओल्ड एज होम अर्थात ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्राची कल्पना पुढे आली असे सांगत आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी ही सुविधा नागरिकांना उपलब्ध झाल्याचा आनंद व्यक्त केला. ही संकल्पना मांडण्यापासून, जागा उपलब्ध करुन घेण्यापासून हे केंद्र कार्यान्वित होईपर्यंत विविध टप्प्यांवर स्वत: पुढाकार घेऊन केलेल्या कार्यवाहीचा तपशील त्यांनी यावेळी सांगितला.

नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने से.38 करावे तलावानजिक सीवूड नेरुळ याठिकाणी उभारण्यात आलेल्या वृध्दाश्रमामध्ये आयोजित ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळाव्याप्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे व मुंबई – नवी मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांचा इतरांना हेवा वाटावा अशा प्रकारचे कार्य येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी होत असून सानिध्य, स्पर्श व संवाद या तीन गोष्टी ज्येष्ठांसाठी महत्वाचे असल्याचे लक्षात घेत विरंगुळा केंद्रासारखी संकल्पना तसेच वृध्दाश्रमासारखी सुविधा उपलब्ध करुन देऊन महानगरपालिकेने ज्येष्ठांप्रती आपला आदरभाव व्यक्त्‍ केला असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते, गटारे, दिवाबत्ती अशा सुविधा कामांच्या पलिकडे जाऊन समाजविकासासाठी भरीव काम करणे हे नवी मुंबई महानगरपालिकेचे वैशिष्ट असून यापुढील काळात ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अदययावत आरोग्य सुविधा आता उपलब्ध्‍ होत असून औषधोपचारामुळे आयुर्मानही वाढत असल्याचे मत व्यक्त करीत यापुढील काळात ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन तशा प्रकारचे नियोजन शासन, प्रशासनाला करावे लागेल असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्री.अण्णासाहेब टेकाळे यांनी नवी मुंबई इतक्या ज्येष्ठ नागरिकांकरिता सुविधा कोणत्याच शहरात उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत असे स्पष्ट करीत ज्येष्ठांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. विरंगुळा केंद्राप्रमाणेच वृध्दाश्रम ही चांगली सुविधा असून त्याचा लाभ मोठया प्रमाणात होईल असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या मुंबई – नवी मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्री.सुरेश पोटे यांनी ही वास्तू ज्येष्ठ नागरिकांना मायेचा आधार देणारी होईल असे सांगितले. समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांनी ज्येष्ठांकरिता महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र कक्षाव्दारे ज्येष्ठांना आपले म्हणणे मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्धता, विविध सोयीसुविधांनीयुक्त 34 ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे, एनएनएमटी प्रवासी बस भाडयात 100 % सवलत, महानगरपालिका रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य सुविधा तसेच उपचारांसाठी अग्रक्रम, शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजना यांची प्रभावी अंमलबजावणी, ज्येष्ठांच्या अंगभूत कला, क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा उपक्रमांसह जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन अशा विविध कामांची माहिती त्यांनी प्रास्ताविकपर मनोगतात दिली. या स्नेहमेळाव्याप्रसंगी नवी मुंबईतील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button