खरीप दुष्काळाच्या अग्रीम मदत वाटपात बार्शी तालुका राज्यात अव्वल ; राज्यातील पहिला लाभार्थी बार्शी तालुक्यातील!

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने प्रतिपात्र शेतकरी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत बार्शी तालुक्याने राज्यात आघाडी घेतली असून, तालुक्यातील तांदळवाडी येथे प्रायोगिक तत्त्वावर दहा खातेदारांना मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या माध्यमातून राज्यातील पहिला लाभार्थी बार्शी तालुक्यातील ठरला आहे.
शासनाने अग्रीम मदत वाटप प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. लाभार्थ्यांच्या याद्या तयार करणे, खातेदारांची माहिती संकलित करणे आणि आवश्यक तपशील अद्ययावत करण्याची सुविधा प्रत्येक तहसीलदारांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरातील तहसील स्तरावर ही प्रक्रिया सुरू असताना बार्शी तालुक्याने तांदळवाडी येथून प्रत्यक्ष मदत वितरण प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्यात ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाचे महसूल सहाय्यक संदीप नालपे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच प्रत्येक गावाचे नियंत्रण अधिकारी आणि ग्रामस्तरीय पंचनामा समितीमधील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे.
लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे, पोर्टलवर याद्या तयार करणे, माहितीची पडताळणी करणे तसेच तांत्रिक अडचणी दूर करून प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत. दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचे उद्दिष्ट तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मदतीचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. त्यादृष्टीने गावनिहाय माहिती संकलन, पडताळणी आणि लाभार्थी याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, हा या मदत वितरणामागील प्रमुख उद्देश आहे.
अग्रीम मदत वितरणाच्या प्रक्रियेत तांदळवाडी येथून झालेली प्रायोगिक सुरुवात आणि राज्यातील पहिला लाभार्थी बार्शी तालुक्यातील ठरणे, ही तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे. महसूल व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया पुढे जात असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर मदतीचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




