नवी दिल्लीपुरस्कारमहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि संगीत परंपरेचा राष्ट्रीय गौरवशास्त्रीय गायनापासून भारूड, शाहिरी, पोवाडा आणि बाहुलीनाट्य या कला प्रकारात सहा युवा कलावंतांना ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क500

नवी दिल्ली, दि. १९ : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातील विविध कलापरंपरांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून, राज्यातील सहा युवा कलावंतांना संगीत नाटक अकादमीच्या प्रतिष्ठित ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारां’ने सन्मानित करण्यात आले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतापासून महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी नाळ जोडलेल्या भारूड, शाहिरी, पोवाडा आणि पारंपरिक बाहुलीनाट्यापर्यंत विविध कलाप्रकारांत योगदान देणाऱ्या या कलावंतांच्या सन्मानामुळे राज्याच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय व्यासपीठावर नवी ओळख मिळाली आहे.

केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते नवी दिल्लीतील रवींद्र भवन परिसरातील मेघदूत थिएटर कॉम्प्लेक्स येथे झालेल्या समारंभात सन २०२४ आणि २०२५ या वर्षांसाठी देशभरातील एकूण १०६ युवा कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’अंतर्गत २५ हजार रुपये रोख, ताम्रपट आणि अंगवस्त्र देऊन कलावंतांचा सन्मान करण्यात येतो. युवा प्रतिभेला प्रोत्साहन देणे, पारंपरिक कलांचे जतन व संवर्धन करणे आणि भारतीय कला-संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या पुरस्कारांचा प्रमुख उद्देश आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्याचे प्रतिबिंब

हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील योगदानाबद्दल कृष्ण बोंगाने आणि अंकिता जोशी यांना सन २०२४ चा संयुक्त युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पारंपरिक ‘बहुरूपी भारूड’ या लोककलाप्रकाराच्या संवर्धनासाठी डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांना गौरविण्यात आले. पारंपरिक कलासूत्री बाहुलीनाट्य कलेच्या जतन व संवर्धनासाठी बालकृष्ण (कृष्णा) गणपत मसगे यांना सन २०२४ चा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.500सन २०२५ च्या पुरस्कारांमध्ये हार्मोनियम वादनातील योगदानाबद्दल तन्मय देवचके, तर शाहिरी, पोवाडा आणि लोकगीतांचा अभ्यास, संशोधन व प्रसार यांसाठी प्रवीण प्रताप जाधव यांचा सन्मान करण्यात आला. तन्मय देवचके हे पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित नव्हते.

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ही शास्त्रीय संगीत, संतपरंपरेशी संबंधित लोककला, शाहिरी, पोवाडे आणि विविध पारंपरिक सादरीकरणांच्या समृद्ध संगमातून घडली आहे. या कलापरंपरा केवळ मनोरंजनाची साधने नसून त्या समाजाचा इतिहास, लोकजीवन, विचारविश्व आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्याचेही काम करतात. या पार्श्वभूमीवर सहा युवा कलावंतांना मिळालेला पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या विविधांगी कलाविश्वातील योगदानाची राष्ट्रीय पातळीवर घेतलेली दखल आहे.

या समारंभास केंद्रीय संस्कृती मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, अकादमीचे उपाध्यक्ष अनवर खान मांगणियार आणि सचिव राजू दास उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button