आमदार दिलीप सोपल यांच्या पाठपुराव्याला यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कर्करुग्णांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत PET-CT स्कॅन तपासणीचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पात्र कर्करुग्णांना महागड्या तपासणीचा आर्थिक भार कमी करण्यास मदत होणार आहे.
आमदार ना. दिलीप सोपल, कार्याध्यक्ष, स्व. डॉ. बी. एम. नेने अश्विनी रूरल कॅन्सर रिसर्च सेंटर, बार्शी, यांनी कर्करुग्णांची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची समक्ष भेट घेऊन PET-CT तपासणीचा जनआरोग्य योजनांमध्ये समावेश करण्याची मागणी केली होती.
कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी PET-CT स्कॅन महत्त्वाची तपासणी आहे. मात्र, या तपासणीचा खर्च जास्त असल्याने अनेक रुग्णांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा आर्थिक परिस्थितीमुळे तपासणीला विलंब होऊन उपचारांच्या नियोजनावरही परिणाम होतो. ही बाब आमदार दिलीप सोपल यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संबंधित यंत्रणेने कार्यवाही केली. सार्वजनिक आरोग्य विभागाने अभ्यास समितीच्या शिफारशींचा विचार करून दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला.
या निर्णयानुसार, ६३ कर्करोग उपचार पॅकेजमध्ये PET-CT स्कॅनचा अतिरिक्त निदान प्रक्रिया (Add-on Diagnostic Procedure) म्हणून समावेश करण्यात आला आहे. तसेच निवडक १३ प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी स्वतंत्र/नियमित निदान प्रक्रिया (Regular/Primary Procedure) म्हणून PET-CT स्कॅनला मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे पात्र कर्करुग्णांना योजनेच्या नियमानुसार तपासणीची सुविधा मिळण्यास मदत होणार असून, निदान व उपचार अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. कर्करुग्णांच्या आरोग्यहिताला प्राधान्य देत आमदार दिलीप सोपल यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून, बार्शीसह राज्यातील पात्र कर्करुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.




