क्रीडा विषयकपुरस्कारमहाराष्ट्ररायगड

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

रायगड-अलिबाग: रायगड जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक आणि खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन २०२५-२६ या वर्षाकरिता जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी पात्र क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंनी आपले अर्ज १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांनी केले आहे.

राज्य व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंच्या क्रीडा कामगिरीचा गौरव व्हावा, या उद्देशाने राज्यस्तरावर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, तर जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. जिल्हास्तरावर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक तसेच गुणवंत क्रीडापटूंना पुरस्कार देण्यात येणार असून, क्रीडापटूंच्या पुरस्कारामध्ये पुरुष, महिला आणि दिव्यांग खेळाडूंचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि १० हजार रुपये रोख असे आहे.

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षांचे वास्तव्य असणे आवश्यक आहे. क्रीडा मार्गदर्शकाने महाराष्ट्रात सलग १० वर्षे क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे आणि त्याचे वय ३५ वर्षे पूर्ण असावे. तसेच, मागील १० वर्षांत वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पदकविजेते खेळाडू, तसेच कनिष्ठ, शालेय, ग्रामीण आणि महिला (खेलो इंडिया) गटांतील राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले खेळाडू घडविणाऱ्या मार्गदर्शकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येईल.500खेळाडूंच्या पुरस्कारासाठी पुरस्काराच्या वर्षासह लगतपूर्व पाच वर्षांपैकी किमान दोन वर्षे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले असणे आवश्यक आहे. संबंधित खेळाडूने मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ, कनिष्ठ, शालेय, राष्ट्रीय शालेय तसेच केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला असावा.

या पुरस्कारासाठीचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत तालुका क्रीडा संकुल, नेहुली-संगम, ता. अलिबाग, जि. रायगड येथून प्राप्त करून घ्यावेत. पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड येथे १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत.

अधिक माहितीसाठी ८०९७०२८३९८, ९९६०७०२५१० किंवा ७७६९९१४१५२ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील पात्र क्रीडा मार्गदर्शक आणि खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांनी केले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button