धाराशिवमहाराष्ट्रयोजनाशैक्षणिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ ; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार

B1न्यूज मराठी नेटवर्क500

धाराशिव,दि.१७ ऑक्टोबर : आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणाच्या संधीपासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये,यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानात वाढ करण्यात आली आहे.या निर्णयामुळे शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना भोजन,निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी अधिक आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या ६ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत स्वाधार योजनेच्या अनुदानात कालानुरूप वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करून योजनेच्या वार्षिक अनुदानात सुधारणा केली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित ft जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.यामध्ये इयत्ता अकरावी,बारावी तसेच व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे,यासाठी भोजन भत्ता,निवास भत्ता आणि इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या निवास,भोजन आणि शैक्षणिक गरजांवरील खर्चातही वाढ झाली आहे.त्यामुळे स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानात कालानुरूप वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.या अनुषंगाने मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे पात्र विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

सुधारित अनुदानानुसार मुंबई शहर,मुंबई उपनगर,नवी मुंबई, ठाणे,पुणे,पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी वार्षिक ६० हजार रुपये अनुदान मिळत होते.आता सुधारीत अनुदानाची रक्कम ८० हजार रुपये इतकी मिळणार आहे.इतर महसूल विभागीय शहरांमध्ये तसेच उर्वरित ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी वार्षिक ५१ हजार रुपये अनुदान मिळत होते. या विद्यार्थ्यांसाठी सुधारित वार्षिक अनुदानाची रक्कम ६८ हजार रुपये करण्यात आली आहे.500इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयांमध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी वार्षिक ४३ हजार रुपये अनुदान मिळत होते.सुधारित निर्णयानुसार या विद्यार्थ्यांना वार्षिक ५७ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी वार्षिक ३८ हजार रुपये अनुदानाची तरतूद होती.आता सुधारीत अनुदानाची रक्कम ५० हजार रुपये इतकी मिळणार आहे.

या अनुदानाव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्रतिवर्ष आठ हजार रुपये,तर अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष चार हजार रुपये इतकी रक्कम ठोक स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निवास व भोजनाबरोबरच आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठीही आर्थिक मदत होणार आहे.

स्वाधार योजनेच्या अनुदानात करण्यात आलेल्या या वाढीमुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे शिक्षणात अडथळे निर्माण होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा महत्त्वपूर्ण आधार मिळणार आहे.

तरी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सुधारित अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button