तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेंट जोसेफ स्कूल, बार्शीचा प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक

रियांश बुडुक व शयान वाजीफदार यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. १७ ऑक्टोबर : पंचायत समिती शिक्षण विभाग, बार्शी व सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२६-२७ मध्ये सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलने प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे शाळेचे विद्यार्थी रियांश बुडुक व शयान वाजीफदार यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
दि. १५ व १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल, बार्शी येथे हे विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दि. १५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या प्रदर्शनात प्राथमिक गटातून १३० प्रयोगांसह २६० विद्यार्थ्यांनी, तर माध्यमिक गटातून ९० प्रयोगांसह १८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रयोग व प्रतिकृती सादर करून आपल्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दर्शन घडविले.
दि. १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शनाचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विविध महाविद्यालयांतील विषयतज्ज्ञांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रमुख पाहुणे अक्षय सोनवणे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना बक्षिसे आणि सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले. या प्रदर्शनातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आता जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे.
सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलच्या रियांश बुडुक व शयान वाजीफदार या विद्यार्थ्यांना अमित सॅम्युअल व श्रीमती अनु सेबास्टियन यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे शाळेचे मुख्याध्यापक वर्गीस ऑगस्थी, व्यवस्थापक फा. जेसन, मार्गदर्शक शिक्षक आणि पालक यांच्या सहकार्यामुळे हे यश संपादन करता आले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, निरीक्षणक्षमता आणि सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रदर्शनातील यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. रियांश बुडुक व शयान वाजीफदार यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बार्शी शहरात सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी, पालक वर्गा कडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.




