महाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, फेब्रुवारी-मार्च २०२७ मधील दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी सवलत; राज्य मंडळाच्या पुढील सूचना निर्गमित होणार

सोलापूर जिल्ह्यात दहावीचे ७२ हजार १७०, तर बारावीचे ४९ हजार ६६२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर, दि. १६ : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश होईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येणार असून, याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सविस्तर सूचना निर्गमित होणार आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.

मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विशेष उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांसाठी ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्याची प्रक्रिया सुरू असून, दुष्काळग्रस्त भागातील पात्र विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ मिळावा, यासाठी पुढील आदेश होईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता आवेदनपत्रे भरून घेण्यात येणार आहेत. यासंदर्भात राज्य मंडळाकडून पुढील सविस्तर सूचना निर्गमित करण्यात येतील. परीक्षा शुल्काअभावी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे.500दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण व शहर विभाग मिळून फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या परीक्षेसाठी दहावीचे एकूण ७२ हजार १७० विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. यामध्ये ३८ हजार ७१७ मुले व ३३ हजार ४५३ मुलींचा समावेश आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण ४९ हजार ६६२ विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, त्यामध्ये २५ हजार ९५१ मुले व २३ हजार ७११ मुली आहेत.

ग्रामीण भागातील तालुकानिहाय विद्यार्थी संख्या : सोलापूर ग्रामीण भागातील ११ तालुक्यांमध्ये दहावीच्या परीक्षेसाठी पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ७ हजार ९५२ विद्यार्थी, माळशिरस ७ हजार ३५९, बार्शी ६ हजार ७५, सांगोला ५ हजार ७२८, माढा ५ हजार ५९७, उत्तर सोलापूर ५ हजार १५२, अक्कलकोट ४ हजार ७२२, मोहोळ ४ हजार ६०२, दक्षिण सोलापूर ४ हजार ३४३, मंगळवेढा ३ हजार ८२४ आणि करमाळा तालुक्यात ३ हजार ३५५ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५८ हजार ७०९ आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी ग्रामीण भागात पंढरपूर तालुक्यात ६ हजार १५७, माळशिरस ४ हजार ९८२, बार्शी ४ हजार ७९१, सांगोला ४ हजार १५२, माढा ३ हजार ९१८, उत्तर सोलापूर २ हजार ७८८, मोहोळ २ हजार ७६४, मंगळवेढा २ हजार ५५३, दक्षिण सोलापूर २ हजार ५०८, अक्कलकोट २ हजार ४२३ आणि करमाळा तालुक्यात २ हजार ६१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. ग्रामीण भागातील बारावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३९ हजार ९७ आहे.

सोलापूर शहर विभागातील विद्यार्थी संख्या : शहरातील यूआरसी-१ अंतर्गत दहावीचे ७ हजार ५८२ व बारावीचे ५ हजार ५८६ विद्यार्थी, तर यूआरसी-२ अंतर्गत दहावीचे ५ हजार ८७९ व बारावीचे ४ हजार ९७९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button