दिनबार्शीमहाराष्ट्र

थर्ड आय फोटोग्राफर्स क्लबच्या वतीने बार्शीत भव्य कॅमेरा दिंडी

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आगळ्यावेगळ्या उपक्रमातून कॅमेऱ्याप्रती व्यक्त केला आदर

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आज, १९ ऑगस्ट रोजी बार्शी येथे थर्ड आय फोटोग्राफर्स क्लबच्या वतीने भव्य कॅमेरा दिंडीचे आयोजन करण्यात आले. कॅमेऱ्याला दैवत मानून त्याचे पूजन करत पालखीतून कॅमेरा मिरविण्याचा हा आगळावेगळा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.

यावेळेस कुंभार म्हणाले, “कॅमेऱ्याला दैवतासमान मानून त्याचे पूजन आणि पालखीतून मिरवणूक काढण्याचा प्रकार मी प्रथमच पाहत आहे. हा अत्यंत आगळावेगळा उपक्रम असून, यातून फोटोग्राफर्सचे कॅमेऱ्यावरील प्रेम, त्यांच्यातील एकता तसेच चांगली समाजभावना दिसून येते. प्रत्येकाने आपल्या व्यवसायावर असेच प्रेम केले, तर तो व्यवसाय निश्चितच वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो.”

दरवर्षीप्रमाणे यंदाही कॅमेरा पूजनाचा सपत्नीक मान ज्येष्ठ फोटोग्राफर सोमनाथ सगरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सारिका सोमनाथ सगरे यांना देण्यात आला.500या कॅमेरा दिंडीमध्ये बार्शी परिसरातील बहुसंख्य फोटोग्राफर्स सहभागी झाले होते. पारंपरिक फेटे परिधान करून फोटोग्राफर्सनी मोठ्या उत्साहात आणि सन्मानाने मिरवणुकीत सहभाग घेतला. कॅमेऱ्याला देवत्व देत त्याचे पूजन करून काढण्यात आलेली ही दिंडी फोटोग्राफी व्यवसायाशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करणारी ठरली.

अंकुश कंगले यांच्या मार्गदर्शनाखाली थर्ड आय फोटोग्राफर्स क्लबच्या वतीने मागील चार वर्षांपासून या कॅमेरा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. फोटोग्राफर्समध्ये एकजूट निर्माण करण्याबरोबरच आपल्या व्यवसायाविषयी अभिमान आणि आदराची भावना वाढीस लागावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सोमनाथ सगरे, चरणसिंग परदेशी, लक्ष्मीनारायण मिश्रा, राम नवले, राजेश वानखेडे, लक्ष्मण जाधव, बंटी काळे, सचिन शहापुरे आणि नवनाथ गुंड यांनी परिश्रम घेतले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button