स्वातंत्र्य दिन व युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : के. एल. ई. सोसायटी बेळगांवी संचलित सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल बार्शी येथे स्वातंत्र्य दिन व युवा दिनाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, शाखा बार्शी यांच्या वतीने ‘व्यसनमुक्ती, तणावमुक्त जीवन व नशामुक्त समाजनिर्मिती’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रशालेतील १,४०० पेक्षा अधिक विद्यार्थी तसेच ६० पेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक उपस्थित होते. ब्रह्मकुमारी अनिता दीदी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करत तणावमुक्त व सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले. निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सकारात्मक विचार यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी ब्रह्मकुमारी निशा दीदी यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा आणि नशामुक्त जीवनाची प्रतिज्ञा दिली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिज्ञा घेत नशामुक्त समाजनिर्मितीचा संकल्प केला. यानंतर मोहन भाई बुचडे यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील एक प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केला. महाविद्यालयीन जीवनात मित्रांकडून त्यांना व्यसन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, मित्रांचा आग्रह असूनही त्यांनी त्या प्रस्तावाला ठामपणे नकार दिला. त्या वेळी घेतलेला तो ठाम नकारच आपल्या आयुष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्या एका ठाम नकारामुळेच आपण व्यसनापासून दूर राहिलो आणि आज विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शक म्हणून उभे आहोत, असे त्यांनी आपल्या स्वअनुभवातून सांगितले.
“मित्रांकडून, परिचितांकडून किंवा इतर कोणाकडूनही भविष्यात व्यसन करण्याचा प्रस्ताव आला, तर त्याला पहिल्याच क्षणी ठाम नकार द्या. ‘नाही’ म्हणण्याची ताकद आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे,” असा संदेश मोहनभाईंनी विद्यार्थ्यांना दिला. स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगत त्यांनी व्यसनाची सुरुवात होण्यापूर्वीच त्याला नकार देणे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडणे याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले.
कार्यक्रमास ब्रह्माकुमारी हंसा दीदी, विलास बारंगुळे, मोहन भाई बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. सतीश होनराव यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सूर्यकांत आदलिंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्योत्स्ना देवगुंडे मॅडम यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती, सकारात्मक विचारसरणी आणि तणावमुक्त जीवनाचा संदेश रुजविणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विशेषतः स्वतःच्या जीवनातील अनुभवातून व्यसनाला ठाम नकार देण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्याने या मार्गदर्शनाला अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.




